तिकीट विक्रीतून दिवसभरात जमा झालेली चार लाख ८० हजार रुपयांची रक्कम चोरटय़ांनी लंपास करण्याची दुर्घटना बुधवारी कांदिवली रेल्वे स्थानकात घडली. मुख्य तिकीट अधीक्षकाने हात धुण्यासाठी पैशांची बॅग खाली ठेवली असता अज्ञात भामटय़ाने ती लंपास केली. कांदिवली स्थानकावरील दहाच्या दहा तिकीट खिडक्यांवर जमा झालेली रक्कम तिकीट अधीक्षक शंकर यांनी एका सूटकेसमध्ये घेतली होती. ही रक्कम जमा करण्यासाठी ते निघाले असता मध्ये पाणपोईवर हात धुण्यासाठी थांबले. सुटकेस खाली ठेवून ते हात धुवत असता एका भामटय़ाने ही सुटकेस लांबवली. याप्रकरणी शंकर यांनी रेल्वे स्थानकात तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या हवालदाराला जबाबदार धरले आहे. हवालदार भोलानाथ गुप्ता याने सुटकेसवर लक्ष ठेवले नाही, असा ठपका शंकर यांनी ठेवला आहे.