सुरक्षेसाठी मध्य रेल्वेचा निर्णय

यार्डमध्ये उभ्या असलेल्या लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या डब्यांना लागलेल्या आगीच्या घटनानंतर यार्डमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यार्डात उभ्या असलेल्या गाडय़ांच्या सुरक्षेसोबतच या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आरोपींना पकडण्यासाठी या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत मिळेल, अशी आशा रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.

सीएसएमटीजवळील यार्डमध्ये उभ्या असलेल्या एका एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागल्याची घटना घडली होती. सायंकाळच्या सुमारास लागलेल्या आगीत डबा पूर्णपणे जळून खाक झाला होता. महत्त्वाची बाब म्हणजे त्या वेळी आजूबाजूला यार्डमध्ये अनेक कर्मचाऱ्यांची ये-जा असतानाच लागलेल्या या आगीमुळे अनेक शंका निर्माण झाल्या. याची मध्य रेल्वेने चौकशी करण्याचा निर्णयही घेतला आहे. त्याआधी काही महिन्यांपूर्वी ठाणे स्थानकाजवळील यार्डमध्येही उभ्या असलेल्या एका लोकलच्या डब्याला मोठी आग लागली होती. त्या वेळीही दोन डबे पूर्णपणे जळले होते. अशा घटनांची चौकशी करताना त्यात रेल्वेला अद्यापही यश आलेले नाही. महत्त्वाची बाब म्हणजे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के.शर्मा यांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात करणे कठीण असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यामुळे यावर लवकरच उपाययोजना केल्या जातील, अशी माहितीही त्यांनी दिली होती. मध्य रेल्वेने यार्डमधील घडलेल्या घटनांनंतर अखेर सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी, वाडीबंदर, एलटीटी, ठाणे यासह अन्य काही यार्डमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. यासाठी मध्य रेल्वेकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा अभ्यासही केला जात असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

यार्डमध्ये एखादा अनुचित प्रकार किंवा दुर्घटना घडल्यास सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ते कैद होईल आणि त्या घटनेचे नेमके कारण समजतानाच त्याला आळा घालण्यास मदत होईल. कॅमेरा बसविण्याची जागा, त्याला लागणारा खर्च इत्यादी बाब तपासल्या जात आहेत. लवकरच हे कॅमेरे बसविले जातील. त्याचे नियंत्रण हे रेल्वे सुरक्षा दलाकडे असेल.

यार्डातील आगी

  • १७ जानेवारी २०१८ रोजी ठाणे स्थानकाजवळील यार्डमध्ये उभ्या असलेल्या एका रिकाम्या लोकलच्या डब्याला आग लागली होती.
  • २९ मे २०१८ रोजी सीएसएमटीजवळील यार्डमध्ये उभ्या असलेल्या एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागली होती.