महासंचालक पदाची सूत्रे संजय पांडे यांनी स्वीकारली

मुंबई : पोलीस दलाची प्रतिमा डागाळू पाहणाऱ्या बेशिस्त, भ्रष्ट वृत्तीच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे, नागरिकांचा विश्वास संपादन करून पोलीस दलाचे कामकाज सुरळीत सुरू ठेवणे यास प्राधान्य असेल, अशी प्रतिक्रि या पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी व्यक्त के ली.  त्यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यरभार सोपविल्याचे शुक्र वारी रात्री उशिरा गृह विभागाने जाहीर के ले. शनिवारी दुपारी त्यांनी महासंचालक पदाची सूत्रे हाती घेतली.

पांडे १९८६ तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. आयआयटी कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्स(बी. टेक.) आणि  हार्वर्ड विद्यापीठातून नागरी प्रशासन या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. पोलीस दलात प्रामाणिक आणि कर्तव्यकठोर अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. राज्य पोलीस सेवेत रुजू झाल्यानंतर पुणे, भंडारा येथे त्यांनी कर्तव्य बजावले. १९९२-९३मध्ये शहरात जातीय दंगल उसळली तेव्हा पांडे परिमंडळ आठचे उपायुक्त होते. मुंबई पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेसह अंमली पदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम के ले.  चर्मकार घोटाळा त्यांनी उजेडात आणला. पंतप्रधान सुरक्षा, अन्न व औषध प्रशासनालयाचे सहआयुक्त, राज्य राखीव पोलीस बलाचे उपमहानिरीक्षक, मानवी हक्क आयोगावर महानिरीक्षक, वजन व माप नियंत्रक, गृहरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक, महासंचालक  आणि राज्य सुरक्षा महामंडळाचे महासंचालक आदी पदांची जबाबदारी त्यांनी हाताळली.

सचिन वाझे प्रकरणानंतर गृह विभागाने परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली. त्या जागी तत्कालीन पोलीस महासंचालक (अतिरिक्त कार्यभार) हेमंत नगराळे यांची नियुक्त केली. नगराळे यांच्या जागी रजनीश सेठ यांना महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. त्या वेळी पांडे यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले. सेवाज्येष्ठ महासंचालक असताना वेळोवेळी डावलण्यात आले. त्याचीच पुनरावृत्ती झाली. राज्याच्या महासंचालक पदासाठी पात्र असूनही सेवाकाळानुसार तुलनेने कनिष्ठ अधिकाऱ्याकडे(सेठ)  महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला.