अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली. मात्र आपल्याला एनसीबीचे समन्स मिळालेच नसल्याचं रकुलने माध्यमांना सांगितलं. बुधवारी रकुलला समन्स बजावले असून विविध माध्यमांतून तिच्याशी संपर्क साधला असता तिने काहीच उत्तर दिलं नसल्याचं एनसीबीने गुरूवारी सकाळी स्पष्ट केलं. त्यानंतर थोड्या वेळाने रकुलने समन्स स्वीकारले असून घराचा नवीन पत्तासुद्धा सांगितल्याचं एनसीबीकडून सांगण्यात आलं. त्यामुळे आता शुक्रवारी (२५ सप्टेंबर) दीपिका पदुकोणसोबत रकुलची चौकशी होणार आहे.

एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूशी अमली पदार्थाचा संबंध आहे का? या मुद्दय़ासोबत हिंदी चित्रपटसृष्टी (बॉलिवूड) आणि अमली पदार्थ या समीकरणाबाबतही तपास सुरू आहे.

सुशांत मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने चौकशीदरम्यान सारा, रकुल यांचा उल्लेख केला होता. सुशांतच्या लोणावळ्यातील शेतघरी केलेल्या चौकशीत एनसीबी पथकाला श्रद्धाबाबत माहिती मिळाली, तर बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक तारे-तारकांशी जुळलेल्या ‘क्वान टॅलेंट मॅनेजमेंट’ कंपनीची कर्मचारी करिश्मा प्रकाश या तरुणीच्या चौकशीनंतर एनसीबीने दीपिकाला समन्स जारी केले.

दीपिका शूटिंगनिमित्त गोव्याला गेली होती. एनसीबीकडून समन्स मिळताच ती गोव्याहून मुंबईला परततेय. शुक्रवारी दीपिकासुद्धा चौकशीसाठी हजर राहणार आहे.