विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री राम शिंदे तसेच शिवाजी कर्डीले, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड यांचा पराभव झाल्यानंतर, या सर्वांनी पक्षश्रेष्ठींकडे राधाकृष्ण विखे यांनी विरोधकांना मदत केल्याने पराभवाला सामोरे जावे लागले असल्याची तक्रार केली गेली होती. शिवाय, भाजपाचे सरकार बनले तर त्यांना मंत्रिपद देऊ नये, अशीही मागणी देखील करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आज भाजपाच्या प्रदेश कार्यालयात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह संघटनमंत्री विजय पुराणीक यांच्या नेतृत्वात अमहदनगर जिल्ह्याच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली.यानिमित्त विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच राम शिंदे व राधाकृष्ण विखे पाटील समोरासमोर आले होते. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली व काय ठरले यासंदर्भात राम शिंदे यांनी बैठक संपल्यानंतर माध्यमांना माहिती दिली.

राम शिंदे यांनी सांगितले की, आज भाजपाच्या प्रदेश कार्यालायत अहमदनगर जिल्ह्याच्या कोअर कमिटीची पार पडली. विधानसभा निवडणुकीनंतर ही कोअर कमिटीची बैठक प्रदेशाच्या नेतृत्वासमोर घ्यावी असा आमचा सर्वांचा आग्रह होता. विधनासभा निवडणुकीसंदर्भातही या बैठकत चर्चा झाली. आगामी जिल्हापरिषद निवडणुका व जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात देखील बैठकीत चर्चा झाली. विशेषकरून विधनासभा निवडणुकीतील जे पराभूत उमेदवार आहेत व निवडणुकीतील त्यांचे अनुभव या पार्श्वभूमीवर प्रथमच बैठक विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व संघटनमंत्री विजय पुराणीक यांच्या उपस्थितीत पार पडली. तर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे या बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. साधारण तासभर चर्चा झाल्यानंर प्रत्येक उमेदवाराच्या संदर्भात सर्वांचं म्हणणं ऐकुण घेतलं गेलं. सर्व बाबींची गांर्भियांने दखल घेतली गेलेली आहे. संघटनमंत्री विजय पुराणीक यांना योग्य त्या कार्यवाहीसाठी एक स्वतंत्र व्यवस्था उभी करण्यास व एक अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.

या बैठकीनिमित्त पहिल्यांदाच विखे व आम्ही समोरासमोर आलो, त्यामुळे दोन्ही बाजू ऐकुण घेण्यात आल्या. भाजपामध्ये या स्तरावर म्हणणं ऐकुण घेणं व त्याबाबत कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे व ते आज झालेलं आहे. आमचं देखील यामध्ये समाधान झालेलं आहे. मला निश्चितपणे माहिती आहे की, कार्यवाहीसाठी जी व्यवस्था उभी करून माहिती घेण्यास सांगितली आहे, त्यानंतर त्याबाबत कार्यवाही होईल. दोन्ही बाजू ऐकुण घेतलेल्या आहेत, यानंतर कोणत्याही निर्णयापर्यंत येण्याअगोदर जी काही कार्यवाही करायची आहे, त्यासाठीचा वस्तूनिष्ठ अहवाल संघटनमंत्री पुराणीक हे प्राप्त करून घेणार आहेत. त्यावरून प्रदेश यासंदर्भात कार्यवाही करणार आहे. यामुळे प्रदेश नेतृत्वाकडून देण्यात आलेल्या निर्देशावर आमचं समाधान झालं आहे.

तसेच, जिल्हापरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात उद्या संध्याकाळी कोअर कमिटीची अहमदनगरमध्ये बैठक होणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील व माझ्यावर विशेषकरून यासंदर्भातली जबाबदारी प्रदेश नेतृत्वाकडून सोपवण्यात आली असल्याचेही राम शिंदे यांनी यावेळी सांगितले.