भीमा कोरेगाव हिंसाचाराला जबाबदार असल्याचाआरोप करत  संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी करण्यासाठी भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी २६ मार्चला विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे; परंतु त्या मोर्चात मी वा माझा पक्ष सहभागी होणार नाही, मात्र भीमा कोरेगावच्या दंगलीत भिडे हे आरोपी असतील, तर त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.  भीमा कोरेगाव हिंसाचाराला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे जबाबदार असून त्यांना अटक करा, अशी पहिल्यांदा प्रकाश आंबेडकर यांनी मागणी केली होती. त्यानंतर आता अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर एकबोटे यांना अटक करण्यात आली; परंतु संभाजी भिडे यांना अटक का केली जात नाही, असा आंबेडकर यांचा सवाल आहे. भिडे यांना तत्काळ अटक करावी, त्याबाबत कारवाई होत नसल्याने सोमवारी आयोजित केलेल्या मोर्चात मोठय़ा संख्येने आंबेडकरी अनुयायी तसेच कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू आहे.