बिबटय़ा, अस्वल, तरस, कोल्हा, कासव पाहता येणार

मुंबई : भायखळ्याच्या ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्याना’त (राणी बाग) प्राणी पक्षी पाहायला येणाऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. प्रजासत्ताकदिनी प्राणी व पक्ष्यांच्या वेगवेगळ्या ६ दालनांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. उद्यानात नव्याने दाखल झालेले बिबटय़ा, अस्वल, तरस, कोल्हा, कासव हे प्राणी पर्यटकांना पाहता येणार आहेत. तसेच पाच मजली उंच ‘मुक्त पक्षीविहार’ही खुले होणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून राणी बागेच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी पेंग्विन पक्षी आल्यानंतर उद्यानात येणाऱ्या पर्यटकांची संख्या व महसूल चांगलाच वाढला. मात्र पर्यटकांना पेंग्विनव्यतिरिक्त कोणताच प्राणी-पक्षी पाहायला मिळत नव्हता. त्यामुळे पर्यटकांचा भ्रमनिरास होत होता. आता मात्र एकाच वेळी सहा दालने सुरू केली जाणार आहेत. रविवारी २६ जानेवारीला या दालनांचे लोकार्पण होणार आहे.

पक्षी मुक्तविहारचे आकर्षण

लोकार्पण करण्यात येणाऱ्या ६ दालनांमध्ये वैशिष्टय़पूर्ण ‘पक्षी मुक्तविहार’ दालन आहे. तब्बल १८ हजार २३४ चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या व सुमारे ५ मजली इमारतीच्या उंचीएवढय़ा असणाऱ्या या ‘मुक्त पक्षीविहारा’त विविध प्रजातींचे सुमारे १०० पक्षी एकत्र नांदणार आहेत. येथे बांधण्यात आलेल्या छोटय़ाशा पुलावरून भ्रमंती करत पक्ष्यांना जवळून न्याहाळण्याची            संधी पर्यटकांना मिळेल. यात बजरीगर, क्रौंच, हॅरॉननाइट, पेलिकन, करकोचा, सारस, मकाव यासारख्या विविध पक्ष्यांचा समावेश आहे. या मुक्तविहारामध्ये पक्ष्यांना बसण्यासाठी झाडांवर वैशिष्टय़पूर्ण पद्धतीची व्यवस्था असेल. यासोबतच पक्ष्यांच्या घरटय़ांचीही काळजी घेण्यात आली आहे. याच विहारामध्ये १६ फूट उंचीवरून वाहणारा नयनरम्य धबधबा आणि मनोहारी ओहोळ देखील आहे. या मुक्त पक्षीविहारामधील वातावरण व सभोवताल पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाशी मिळताजुळता असेल. देशातील हा या प्रकारचा पहिलाच पक्षीविहार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

कासवांसाठी स्वतंत्र दालन

कासवासाठी राणीच्या बागेत स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. या दालनात पाण्यातील कासव अर्थात ‘टर्टल’ व जमिनीवरील कासव म्हणजे ‘टॉरटॉईज’ हे एकाच ठिकाणी बघता येतील. सुमारे १ हजार २३४ चौरस फूट एवढे क्षेत्रफळ असलेल्या या दालनात पाण्यातील कासवांसाठी एक छोटे तळे विकसित करण्यात आले आहे, तर जमिनीवरील कासवांसाठी छोटी घरटीही या ठिकाणी आहेत.

पिंजऱ्याऐवजी काचेची दालने

नूतनीकरण केलेल्या प्राणिसंग्रहालयात पारंपरिक पद्धतीचे गज असणारे पिंजरे नाहीत. त्याऐवजी प्राण्यांच्या दालनात भव्य काचा लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे सेल्फीप्रेमींना देखील प्राण्यांसोबत फोटो काढण्याचा आनंद लुटता येईल. कर्नाटकातील मंगळुरू येथील प्राणिसंग्रहालयातून आणलेला बिबटय़ा व कोल्हा, म्हैसूर प्राणिसंग्रहालयातून आणलेला तरस, गुजरातमधील सुरत येथील प्राणिसंग्रहालयातून आणलेले अस्वल अशा नव्यानेच आलेल्या या प्राण्यांसाठी भव्य दालने उभारण्यात आली आहेत. त्या-त्या प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाची वैशिष्टय़े लक्षात घेऊन त्या अनुरूप दालने विकसित करण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, बिबटय़ाला झाडावर चढायला आवडते, हे लक्षात घेऊन त्याच्या दालनात मोठे-मोठे वृक्ष असतील याची काळजी घेण्यात आली आहे.