12 December 2017

News Flash

प्राणीसंग्रहालयाचे शुल्क ५० रुपयांवर?

पेंग्विनसाठी अतिरिक्त शुल्क आकारण्याचा विचारही सुरू असल्याचे समजते.

खास प्रतिनिधी, मुंबई | Updated: May 20, 2017 2:47 AM

शुल्कवाढीबाबत राजकीय मतैक्याची शक्यता; पेंग्विन दर्शनासाठी मात्र अतिरिक्त शुल्क आकारणी

पेंग्विन पाहण्याच्या निमित्ताने भायखळय़ाच्या प्राणिसंग्रहालयाकडे वळत असलेल्या गर्दीच्या पाश्र्वभूमीवर येथील प्रवेश शुल्क पाच रुपयांवरून १०० रुपये करण्याबाबतचा निर्णय पुन्हा आठवडाभर लांबणीवर पडला आहे.  प्रत्येक व्यक्तीमागे प्रवेशशुल्क पाचवरून शंभर रुपये करण्याबाबत राजकीय पक्षांमध्ये मतभेद असल्याने सर्वसहमतीने आता हे शुल्क अध्र्यावर येण्याची शक्यता आहे. मात्र त्याच वेळी केवळ पेंग्विनसाठी अतिरिक्त शुल्क आकारण्याचा विचारही सुरू असल्याचे समजते.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्रवेशशुल्क पाचवरून शंभर रुपये करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला पालिकेत भाजपने तर पालिकेबाहेर ‘सेव्ह राणीबाग फाऊंडेशन’ने विरोध केला. चार महिन्यांच्या विलंबानंतर अखेर प्रशासनाकडून शुल्कवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला असला तरी त्यावर पुढील आठवडय़ातच चर्चा होऊ शकेल. या प्रस्तावानुसार १२ वर्षांवरील सर्वाना १०० रुपये, लहान मुलांना २५ रुपये, चौघांच्या कुटुंबाला १०० रुपये शुल्क लावले जाईल. त्याशिवाय ज्येष्ठ व्यक्ती, पालिका शाळांमधील विद्यार्थी व अपंग व्यक्तींना नि:शुल्क प्रवेश दिला जाईल. वैयक्तिक शुल्कवाढ खूप जास्त असून उद्यानासाठी व पेंग्विनसाठी वेगवेगळे शुल्क आकारावे अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे विरोधी पक्षनेता रवी राजा यांनी सांगितले. त्यानुसार उद्यानासाठी ५० रुपये व पेंग्विनसाठी अतिरिक्त ५० रुपये वाढ करण्यास काँग्रेसची सहमती राहील, असेही ते म्हणाले. भायखळा प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण करण्याचा खर्च तिकीट शुल्कामधून भरून काढण्याची गरज आहे. तिकीट दरवाढ केली नाही तर फक्त मुंबईकरांकडून वेगळ्या करापोटी आलेले पैसे येथे खर्च करावे लागतील, असे एका नगरसेवकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

भायखळा येथील प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण व पेंग्विनच्या देखभालीचा खर्च काही प्रमाणात भरून काढण्यासाठी जानेवारी महिन्यात गटनेत्यांच्या बैठकीत शुल्कवाढीचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला. निवडणुका झाल्यावर एप्रिल महिन्यात पुन्हा गटनेत्यांच्या बैठकीत प्रस्तावावर चर्चा झाली. त्यानंतर ८ मे रोजी बाजार व उद्यान समितीत शुल्कवाढीच्या प्रस्तावावर चर्चा करून तो स्थायी समितीत पाठवण्यात आला. शुक्रवारी केंद्रीय राज्यमंत्री अनिल दवे यांच्या निधनामुळे स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आल्याने आता पुढील शुक्रवारी होत असलेल्या बैठकीत शुल्कवाढीवर निर्णय अपेक्षित आहे.

प्रस्तावित शुल्कानुसार, आई-वडील व दोन मुले अशा चौघांच्या कुटुंबाला अवघ्या १०० रुपयांमध्ये पेंग्विन दर्शन करता येईल. वैयक्तिक शुल्कवाढीबाबत चर्चा सुरू आहे. जनतेच्या हिताला प्राधान्य देऊनच निर्णय घेतला जाईल.

रमेश कोरगावकर, स्थायी समिती अध्यक्ष.

First Published on May 20, 2017 2:47 am

Web Title: rani baug byculla zoo animal museum entrance fee issue