राजकीय लोकशाहीइतकीच सामाजिक लोकशाहीही महत्त्वाची असून तिचा पायाही बळकट हवा, असे परखड विवेचन सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी गुरुवारी येथे केले.

दी इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या स्मृत्यर्थ आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘न्यायदानातील दूरदृष्टी’ (द व्हिजन ऑफ जस्टिस) या विषयावर विचार मांडताना न्या. गोगोई यांनी लोकशाहीचे आणि तिच्या जतनाचे महत्त्व विशद केले.

सध्याच्या द्वेषमूलक आणि भेदभावजनक सामाजिक परिस्थितीला अनुलक्षून न्या. गोगोई म्हणाले की, लोकशाही नुसती कागदोपत्री असून उपयोगी नाही. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही लोकशाहीची मूल्ये समाजात खोलवर रुजलीही पाहिजेत. लोकशाही ही समाजात जिवंतपणे नांदताना दिसली पाहिजे.

आपले विचार निर्भीडपणे मांडणारे आणि प्रसंगी गोंगाटी भासणारे पत्रकार तसेच निर्भय न्याययंत्रणा ही लोकशाही रक्षणाच्या कार्यात अग्रस्थानी असलेली फळी असते. मात्र  हेच चित्र,  निर्भय पत्रकार आणि निर्भीडपणे मते मांडणारे आणि प्रसंगी गोंगाटी भासणारे न्यायाधीश असे,उलट झाले तरीही काही हरकत नाही, असे वक्तव्य न्या. गोगोई यांनी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर पत्रकार परिषद घेऊन जाहीर भाष्य करणाऱ्या चार न्यायाधीशांमध्ये न्या. गोगोई यांचाही सहभाग होता. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

समाजासमोरील प्रश्न, ते उद्भवण्यामागचे हेतू आणि वास्तव याबाबत न्यायप्रक्रियेत ठोस भूमिका घेतली गेली पाहिजे, असेही न्या. गोगोई यांनी ठामपणे सांगितले.

या देशातील लोकशाहीच्या रक्षणात आणि संवर्धनात रामनाथ गोएंका आणि एक्स्प्रेस वृत्तसमूहाचे मोठे योगदान आहे, असा उल्लेखही न्या. गोगोई यांनी आवर्जून केला.

दी इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या २५व्या स्मृतीदिनापासून वार्षिक व्याख्यानाची ही विचारप्रेरक परंपरा सुरू झाली आहे. या व्याख्यान उपक्रमाचा शुभारंभ रिझव्‍‌र्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांच्या व्याख्यानाने मार्च २०१६मध्ये झाला होता. २०१७ साली तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे व्याख्याते होते.