प्रसाद रावकर

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा तलावक्षेत्रात सर्वात कमी पावसाची नोंद झाली असून ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अशीच परिस्थिती राहिल्यास करोना संसर्गापाठोपाठ पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ मुंबईकरांवर ओढवणार आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचे वेळापत्रक बिघडले असून कधी जून, तर कधी जुलै महिना कोरडा जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यंदा जून आणि जुलैमध्ये अधूनमधून हजेरी लावून पाऊस गायब झाला. त्यामुळे पालिकेच्या चिंतेत भर पडली आहे.

मुंबईकरांना मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणामधून वर्षभर पाणीपुरवठा केला जातो. या सातही तलावांमध्ये  गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा कमी पावसाची नोंद झाली आहे. २०१६ ते २०१९ या चार वर्षांमध्ये जुलै अखेपर्यंत तलावक्षेत्रात साधारण एक ते दीड हजार मि.मी. दरम्यान पावसाची नोंद झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून निदर्शनास आले आहे. जुलै महिना संपण्यास अवघा एक आठवडा शिल्लक राहिला आहे. मात्र मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाची नोंद एक हजार मि.मी.च्या खालीच आहे.

भातसामध्ये आतापर्यंत १००८ मि.मी. पावसाची नोंद झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ती कमीच आहे. परिणामी, या तलावांतील जलसाठय़ाची स्थिती चिंता वाढविणारी आहे.

तलावक्षेत्रात २३ जुलैपर्यंत पडलेला पाऊस (मि.मी.मध्ये)

तलाव   २०२०      २०१९   २०१८   २०१७   २०१६

मोडकसागर ७०१ १५२८    १७७७  १९२३          ११८७.४०

तानसा  ६५९ १३२०     १५६६ १८७५   ११५३.६०

विहार   १००८   १६२४     २८४७    २२३०   २११०

तुळशी  १७०८   २०७६     २४५५    १७१५   १९६७

अप्पर वैतरणा   ७१३ ११९८      १८२४   १९०२   १०७३.२०

भातसा  १००८   १५४२     १५४८    १९०४   ११४९

मध्य वैतरणा    ८५२ १२७०     १५७७    १९०८   ११८४.६०

सातही तलावांतील २३ जुलैची पाणी स्थिती (दशलक्ष लिटरमध्ये)

वर्ष पाणीसाठा

२०२०   ४,१९,३१८

२०१९   ७,८५,०८८

२०१८   ११,८०,३४१

२०१७   १२,२५,८६६

२०१६   ८,४६,०४८