२४ तासांमध्ये बेकायदा होर्डिग्ज हटविण्याचे आदेश दिल्यानंतर युद्धपातळीवर, दिवसरात्र काम करून ती हटविणाऱ्या मुंबईसह राज्यातील सर्व पालिका-नगरपरिषदांना ही धडक कारवाई यापुढेही अशीच सुरू ठेवण्याची तंबी मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिली.
मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण-डोंबिवली आणि मीरा-भाईंदर या पालिकांनी न्यायालयाच्या आदेशानंतर २४ तासांमध्ये केलेल्या कारवाईचा लेखाजोखा शुक्रवारी न्यायालयात सादर केला. उर्वरित होर्डिग्ज हटविण्याची कारवाई येत्या तीन-चार दिवसांत पूर्ण केली जाईल, असे आश्वासनही देण्यात आले. त्यावर आदेशानंतर पालिकांनी युद्धपातळीवर केलेल्या कारवाईबाबत न्यायालयाने समाधान व्यक्त केले. मात्र ही कारवाई केवळ न्यायालयाने दिलेल्या मुदतीपर्यंत सीमित न ठेवता ती पुढेही अशीच सुरू ठेवण्याचे बजावले. ही कारवाई अशीच सुरू राहिली, तर अल्पावधीतच बेकायदा होर्डिग्जना आळा बसेल, असा आशावादही न्यायालयाने व्यक्त केला. याप्रकरणी जनजागृतीची नितांत गरज असून त्याची जबाबदारी केवळ पालिकांचीच नाही, तर पोलीस आणि स्थानिक राजकीय नेत्यांचीही आहे. पालिका आयुक्तांनी या नेत्यांची बैठक घेऊन त्यांना याबाबत समुपदेशन करावे, असेही न्यायालयाने सुचविले.
दरम्यान, मुंबईतील सुमारे पाच हजारांहून अधिक बेकायदा होर्डिग्ज, कल्याण-डोंबिवली आणि मीरा-भाईंदरमधील एक हजाराहून अधिक बेकायदा होर्डिग्ज हटविण्यात आल्याची माहिती संबंधित पालिकांच्या वकिलांनी न्यायालयाला दिली. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने पालिकांनी स्वयंसेवी संघटनेचे सदस्य आणि नागरिक असलेल्यांची एक विशेष यंत्रणा स्थापन करावी, अशीही सूचना न्यायालयाने केली. याप्रकरणी काय कारवाई केली आणि न्यायालयाने केलेल्या सूचनांवर काय निर्णय घेतला याबाबत अहवाल सादर करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

तरीही झळकणे सुरूच..
मुंबई : गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईमधील ५०६५ बॅनर्स, फलक, पोस्टर्स झेंडे काढणाऱ्या महापालिकेच्या कामगिरीबद्दल उच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले असले तरी शुक्रवारी अनेक भागांत राजकीय फलक झळकताना दिसत होते. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर पालिका अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती. बुधवारी रात्रीपासूनच बॅनर, फलक, झेंडे, पोस्टर्स काढण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली. शुक्रवापर्यंत ५०६५ बॅनर्स, फलक, पोस्टर्स झेंडे काढण्यात आले. मात्र तरीही मुंबईतील अनेक भागांमध्ये राजकीय नेत्यांची छबी असलेले फलक, बॅनर्स, पोस्टर्स झळकत होते. लहान गल्ल्यांमधील फलक आणि पोस्टर्सकडे मात्र त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
दरम्यान, ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण आदी ठिकाणी बॅनर्स उतरविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. परंतु तेथेही काही बॅनर्स शुक्रवारी सायंकाळपर्यंत काढण्यात आलेले नव्हते.