बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यात आलेला अंगठय़ाचा ठसा प्रत्येक वेळी जुळत नसल्याच्या कारणास्तव नोकरी नाकारण्याच्या रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या तरुणाला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. या तरुणाने त्वचेच्या आजाराविषयी रिझव्‍‌र्ह बँकेला पूर्वकल्पना दिली नाही. त्यामुळे या तरुणाला नोकरी नाकारण्याचा रिझव्‍‌र्ह बँकेचा निर्णय योग्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

ऋतुमानातील बदलामुळे अक्षय सपकाळ या २७ वर्षांच्या तरुणाच्या तळहाताची त्वचा निघून जाते. परिणामी बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यात आलेला अंगठय़ाचा ठसा प्रत्येक वेळी मूळ ठशाशी जुळत नाही. या कारणास्तव रिझव्‍‌र्ह बँकेने साहाय्यक म्हणून अक्षयची केलेली नियुक्ती रद्द केली. या निर्णयाविरोधात त्याने अ‍ॅड्. आशीष गिरी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. साहाय्यक पदासाठी २०१६ मध्ये रिझव्‍‌र्ह बँकेतर्फे घेण्यात आलेल्या प्राथमिक ऑनलाइन परीक्षेत अक्षय उत्तीर्ण झाला होता.

मंगळवारी झालेल्या सुनावणीत सपकाळ याचे प्रत्येक परीक्षेआधी काढण्यात आलेले छायाचित्र जुळत असतानाही त्याच्यावर संशय घेणे योग्य नसल्याचे मत न्यायालयाने नोंदवले होते. त्यानंतर परीक्षेआधी उमेदवाराला कसलाही त्रास आहे की नाही हे त्याने कळवणे अनिवार्य आहे. सपकाळ यानेही त्याला त्वचेचा आजार आहे हे कळवले नाही. त्याने ते कळवले असते तर त्याची ओळख पटवण्यासाठी विशिष्ट व्यवस्था करण्यात आली असती. मात्र बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यात आलेले अंगठय़ाचे ठसे प्रत्येक वेळी जुळत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही बऱ्याच कालावधीने ही बाब त्याने कळवली. या एका कारणास्तव त्याला नोकरी नाकारण्यात आल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

न्यायमूर्ती अकील कुरेशी आणि न्यायमूर्ती शाहरूख काथावाला यांच्या खंडपीठाने रिझव्‍‌र्ह बँकेचे हे म्हणणे मान्य केले.