जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आणि नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्याविरोधात नेत्ररोग विभागातील निवासी डॉक्टरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. विभागप्रमुख शस्त्रक्रिया करू देत नाहीत, सतत अपमान करतात, असा या विद्यार्थ्यांचा दावा असून दुसरीकडे रुग्णांवर उपचार करताना हेळसांड केल्याने चौकशी सुरू असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्याला लक्ष्य केल्याचे डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी भाजप नेत्या शायना एन.सी. यांच्यासह जाऊन थेट आरोग्यमंत्र्यांकडे या प्रकरणी दाद मागितली असून दोन्ही डॉक्टरांना तत्काळ हटविण्याच्या मागणीसाठी रविवारपासून आंदोलनाची हाक दिली आहे.
डॉ. तात्याराव लहाने यांना विचारले असता, नेत्ररोग विभागातील तीन डॉक्टरांनी एकाच आठवडय़ात रुग्णांच्या जिवावर बेततील अशा चुका केल्या. त्यातील एक रुग्ण अजूनही अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. या घटनांची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानेच विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे स्पष्ट केले. ही चौकशी झाली आणि विद्यार्थी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, म्हणूनच हा कांगावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नेत्ररोग विभागात गेल्या वर्षभरात १२ हजार शस्त्रक्रिया झाल्या, त्यातील दोन हजार शस्त्रक्रिया स्वत: विद्यार्थ्यांनी केल्याच्या नोंदीही आहेत. विभागप्रमुख शिकवत नाहीत, हेही धादांत खोटे असल्याचे त्यांनी सांगितले.
जेजेमधील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने (मार्ड) आंदोलनाची हाक दिली असली तरी निवासी डॉक्टरांची राज्यस्तरीय संघटना (मध्यवर्ती मार्ड) मात्र आंदोलनापासून अद्याप दूर आहे. जेजेमधील विद्यार्थ्यांचे नेमके काय म्हणणे आहे, हे जाणून घेऊन उर्वरित राज्यातील शासकीय रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांच्या संघटनांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे मध्यवर्ती मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी स्पष्ट केले.