विद्यार्थ्यांचे काम शंभर पैकी नव्व्यान्नव गुण मिळवणे नसून समाजात, देशात घडणाऱ्या गोष्टींचे शिक्षणाच्या माध्यमातून विश्लेषण करून त्या माध्यमातून बदल घडवणे आहे. हिटरलने जर्मनीत जे केले ते मोदी सरकारला भारतात करू न देणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे, असे स्पष्ट मत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची विद्यार्थी नेता आईषी घोष हिने व्यक्त केले.

‘मुंबई कलेक्टीव्ह’ या संविधान उत्सवात ‘स्टुडंट अ‍ॅज द व्हॅनगार्ड’ या विषयावर आईषी बोलत होती. यावेळी हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी नेता अभिषेक नंदन, पाँडेचेरी विद्यापीठातील विद्यार्थी नेता परिचय यादव, जामियातील विद्यार्थी नेता अफ्रा अबुबक्र, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील आईशा कादेर या उपस्थित होत्या.

‘सरकार दररोज संविधानात बदल घडवत आहे. मात्र धर्मनिरपेक्षता, समानता, एकता या मुद्दय़ांवर आमचे आंदोलन सुरूच राहील. कोणत्याही गोळीला, काठीला आम्ही भीत नाही. भगतसिंगला यांना फासावर लटकवून त्यांचे विचार जिवंत राहिले. आम्हाला मारूनही आमच्या विचारांची ज्योत पुढे जातच राहील,’ असा विश्वास आईषीने व्यक्त केला.

‘हे सरकार बंदुकीच्या बळावर विद्यार्थ्यांना घाबरवत आहे. त्यांना देशद्राही ठरवत आहे. मात्र आंदोलनात सहभागी कोणाही तरुणाशी त्यांनी चर्चा करावी, तेव्हा कोण खरे देशभक्त ते सांगू,’ अशी कणखर भूमिका परिचय यादव याने मांडली. ‘नवा भारत हा स्त्रियांच्या, विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून सुरू होतो. हे सरकार सीएए, एनआरसी, एनपीआर मागे घेत नाही, देशभरातील विद्यापीठांमधील शुल्क वाढ रद्द करत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही परिचय याने सांगितले.

‘विद्यार्थी आंदोलनातून पुढे आलेले नेते आज विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडत आहेत. गरीब विद्यार्थी विद्यापीठांतून शिकू नये ही या सरकारची इच्छा आहे. शिक्षण घेतलेले हे विद्यार्थी तर्क करतील, रोजगार मागतील, व्यवस्थलेला प्रश्न विचारतील याची भीती सरकारला आहे. त्यामुळेच ते विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवत आहे. मात्र शिक्षण, रोजगार मागितल्यावर आम्ही देशद्रोही ठरत असू तर आम्ही देशद्रोही आहोत,’ असे विचार हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी नेता अभिषेक नंदन याने मांडले. समाजवाद, धर्मनिरपेक्षता, एकता आदी मूल्यांची हे सरकार पायमल्ली करत असून ते हटविल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही,’ असा निर्धारही अभिषेक याने व्यक्त केला.