शुक्रवारी जे काही घडले ते दुर्दैवी असले तरी सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ चार न्यायमूर्तीना त्यांनी जे काही त्याबाबत आपला ‘सॅल्यूट’ आहे. निदान त्या निमित्ताने या सगळ्या प्रकाराची चौकशी होईल आणि चूक काय – बरोबर ते ठरेल, असे मत निवृत्त न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांनी व्यक्त केली. या सगळ्या प्रकारामुळे न्यायसंस्थेवरचा विश्वास उडेल, असे काही विद्वानांचे मत आहे. पण मूळात न्यायव्यवस्थेवर सामान्यांचा विश्वास उरला आहे का हा प्रश्न आहे, यावरही चव्हाण यांनी बोट ठेवले.

हे दुर्देवी असून ते टाळता असते. या सगळ्या प्रकारामुळे लोकांच्या न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला, सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिमेला धक्का पोहोचलेला आहे. पत्रकार परिषद घेऊन प्रश्न सुटणार आहे का, असा प्रश्न उपस्थित करताना उलट राजकीय पक्ष या सगळ्याचा गैरफायदा उठवतील, अशी भीती निवृत्त न्यायमूर्ती विजय डागा यांनी व्यक्त केली. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या या चारही न्यायमूर्तीनी असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब केल्याबाबत नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी या चारही न्यायाधीशांचे अभिनंदन केले आहे. काही न्यायाधीश आणि सरकारमधील काही नेते यांचे लागेबांधे यामुळे उघड झाले आहेत, असे हजारे म्हणाले.