राज्यात कुठल्याच पक्षाने सत्तास्थापनेसाठी बहुमतासह दावा न केल्याने राष्ट्रपती राजवट लागू होत असताना काँग्रेसच्या दिल्लीहून आलेल्या नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांची भेटही न घेतल्याने राजकीय परिस्थिती बदलण्याची आशा भाजपला आहे. या परिस्थितीवर लक्ष ठेवून योग्यवेळी भूमिका जाहीर करण्याचा निर्णय भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती भाजप नेते आशीष शेलार यांनी दिली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्यानंतर केंद्र सरकारने त्यास मान्यता दिल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली. या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक ‘वर्षां’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झाली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशीष शेलार, विनोद तावडे आदी उपस्थित होते.

राज्यात कुठल्याही पक्षाने सरकार स्थापन करण्याचा दावा केलेला नाही. कुठल्याही दुसऱ्या पक्षाने एखाद्या पक्षाला पाठिंबा दिल्याचे विधान केलेले नाही. त्याचबरोबर कोणत्याही दोन-तीन पक्षांनी एकत्र येऊन आम्ही सरकार स्थापन करू असे राज्यपालांना सांगितलेले नाही. त्यामुळेच राष्ट्रपती राजवट लागली असा निष्कर्ष भाजपच्या बैठकीत काढण्यात आला. पुरेसा अवधी न मिळाल्यावरून शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा पवित्रा घेतला होता. पण राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने ती याचिका आता अप्रस्तुत ठरते, याकडेही ज्येष्ठ नेत्यांनी लक्ष वेधले.

शिवसेना ही कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह सरकार स्थापन करण्याबाबत प्रयत्न करत आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी दिल्लीहून आलेल्या अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल या कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांची भेटही घेतली नाही ही सूचक बाब असल्याकडे या बैठकीत लक्ष वेधण्यात आले. राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाजप लक्ष ठेवून असून त्याबाबतचे वास्तव लोकांपर्यंत पोहोचवण्यात येईल. त्याचबरोबर योग्यवेळी भाजप आपली भूमिका जाहीर करेल, असे आशीष शेलार यांनी सांगितले.

काहींच्या सत्ताहट्टामुळे ही वेळ

काही लोकांनी सत्तेसाठी जो हट्ट केला आणि जनादेशाचा अनादर केला त्यामुळेच राष्ट्रपती राजवटीची वेळ आल्याची टीका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर केली. काँग्रेस व राष्ट्रवादीने अजूनही शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलेला नाही. इतकेच नव्हे तर कॉंग्रेसचे दिल्लीहून आलेले नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटून चर्चाही केली. पण शिवसेनेच्या नेत्यांची मात्र साधी भेटही घेतली नाही, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला.