महानगरपालिकेकडून नालेसफाई करण्यासाठी दरवर्षी देण्यात येत असलेल्या निधीपैकी केवळ ६८ टक्के निधी रेल्वेने वापरला असून ३२ टक्केचा वापरच केला नाही. पहिल्याच पावसात पाणी तुंबल्याने शहरातील रेल्वेसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे पालिकेकडून देण्यात येणार निधी, त्यांचा वापर व त्यावर देखरेख याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गेल्या पाच वर्षांत पालिकेने रेल्वेला ९.६० कोटी रुपये दिले. त्यापैकी रेल्वेने ५.६६ कोटी रुपये नालेसफाईवर खर्च केले. मात्र या नाल्यांमधून नेमका किती गाळ काढला याबाबत पश्चिम व मध्य रेल्वे या दोन्हीकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मध्य रेल्वेवर सीएसटीपासून मुलुंडपर्यंत ४३ आणि सीएसटी ते मानखुर्द दरम्यान २८ असे ७१ नाले आहेत.
२००९ ते १४ या पाच वर्षांत पालिकेने या नाल्यातील गाळ काढण्यासाठी ७ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी दिला. रेल्वेने त्यातील ३ कोटी ८४ लाख रुपये खर्च केले. पश्चिम रेल्वेवरील ४३ नाल्यांच्या स्वच्छतेसाठी पाच वर्षांत २ कोटी १२ लाख रुपये पालिकेकडून देण्यात आले. रेल्वेने त्यापैकी १ कोटी ८१ लाख रुपये खर्च केले. पालिका दरवर्षी नालेसफाईसाठी दोन्ही रेल्वेना सरासरी १ कोटी ९२ लाख रुपये देत असली तरी त्यातील पूर्ण निधी वापरला जात नाही.