भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान रो-रो सेवा दृष्टीक्षेपात आली आहे. कारण रो-रो बोट मुंबईत दाखल झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता.. जो आता मार्गी लागणार आहे.

भारतमाला प्रकल्पाच्या अंतर्गत मुंबई या महानगराला जोडणाऱ्या मार्गावर रो-रो सेवा सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या अंतर्गत भाऊचा धक्का ते मांडवा या दरम्यान रोल ऑन रोल ऑफ जल वाहतूक सेवा सुरु केली जाणार आहे. यासाठी मांडवा आणि भाऊचा धक्का या ठिकाणी सुसज्ज टर्मिनलही बांधण्यात आले आहेत. ही सेवा खरंतर एप्रिल २०१८ मध्ये सुरु होणं अपेक्षित होतं. मात्र हा प्रकल्प रखडला तो रखडलाच. २०२० चा फेब्रुवारी महिना येऊनही ही सेवा सुरु झाली नाही. आता मात्र दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रोटोपोरस नावाची बोट मुंबईत दाखल झाली आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर रो-रो सेवा सुरु होणार आहे.