रस्त्यांच्या कामात प्लास्टिकचा वापर बंधनकारक

पर्यावरणाला धोका ठरलेल्या प्लास्टिकवर बंदी घालण्याच्या निर्णयाची राज्यात शनिवारपासून अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे  सध्याच्या प्लास्टिकची विल्हेवाट कशी लावायची या विवंचनेत असलेल्या महापालिकांच्या मदतीला सार्वजनिक बांधकाम विभाग धावून आला आहे. राज्यातील सर्व रस्त्यांच्या डांबरीकरणात प्लास्टिकचा वापर बंधनकारक करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील प्लास्टिकची पूर्णपणे विल्हेवाट लागण्यास मदत होईल अशी माहिती पर्यावरण खात्याच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

राज्यात थर्माकोल आणि प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून येत्या २३ जूनपासून या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी व्यापारी आणि लोकांकडे असलेले प्लास्टिक गोळा करण्याची मोहीम अनेक महापालिकांनी हाती घेतली आहे. या प्लास्टिकची विल्हेवाट कशी लावायची या विवंचनेत पालिका असतानाच याच प्लास्टिकपासून कमी खर्चात आणि चांगल्या दर्जाचे रस्ते निर्माण असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे राज्यातही सर्व रस्त्यांच्या कामात प्लास्टिकचा वापर करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यानुसार महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग तसेच अन्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी प्लास्टिकचा वापर अनिवार्य करण्यात आल्याने प्लास्टिकची समस्या मिटेल असेही या अधिकाऱ्याने सांगितले. ज्या रस्त्यांच्या डांबरीकरणात प्लास्टिकचा वापर केला जाईल त्याची तांत्रिक तपासणी वर्षभर केली जाणार असून त्यामुळे प्लास्टिकचा किती लाभ होतो हे स्पष्ट होईल असेही या अधिकाऱ्याने सांगितले.