६३२ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी;  प्रशासन, शिवसेनेचा निषेध करीत भाजपचा सभात्याग

मुंबई : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या स्थायी समितीच्या तातडीच्या बैठकीमध्ये प्रशासनाने सादर केलेल्या रस्तेदुरुस्तीच्या तब्बल ६३२ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना सत्ताधारी शिवसेनेने मंजुरी दिली. विशेष बैठक केवळ तातडीच्या कामासाठी असून रस्तेदुरुस्तीच्या प्रस्तावांना मंजुरी दिल्यास नियमाचा भंग होईल, असा आक्षेप भाजपने घेतला होता. मात्र तरीही शिवसेनेने २०२ रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर केले. त्यामुळे भाजप नगरसेवकांनी  सभात्याग केला.

करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी आवश्यक निधी खर्च करण्यास मंजुरी मिळावी यासाठी स्थायी समितीची तातडीची बैठक आयोजित करण्याची विनंती करणारे पत्र पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना पाठविले होते. त्यानुसार स्थायी समितीची तातडीची बैठक मंगळवारी पालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर २०२ रस्त्यांच्या दुरुस्तीचे ६३२ कोटी ३३ लाख ६८ हजार रुपयांचे प्रस्ताव समाविष्ट करण्यात आले होते. बैठक सुरू होण्यापूर्वी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू होती. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी रस्तेदुरुस्तीचे प्रस्ताव पुकारण्यास सुरुवात करताच भाजप नगरसेवकांनी त्याला आक्षेप घेतला. मुंबई महापालिका अधिनियम ४९ क अन्वये तातडीच्या विशेष बैठकीमध्ये रस्तेदुरुस्तीचे प्रस्ताव घेता येणार नाहीत. या प्रस्तावांना मंजुरी दिल्यास अधिनियमाचा भंग होईल, असा मुद्दा उपस्थित करून भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी या प्रस्तावांना कडाडून विरोध केला. पालिका आयुक्त मनमानी कारभार करून मुंबई महापालिका अधिनियम १८८८ ची पायमल्ली करीत असल्याचा आरोपही प्रभाकर शिंदे यांनी केला. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही प्रभाकर शिंदे यांच्या मुद्दय़ाला पाठिंबा देत रस्तेदुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करू नये, अशी मागणी केली.

पालिका आयुक्तांनी पाठवलेल्या पत्रामध्ये रस्तेदुरुस्तीच्या प्रस्तावांचा उल्लेख असल्याची बाब यशवंत जाधव यांनी स्थायी समितीच्या निदर्शनास आणून दिली. मात्र तरीही हे प्रस्ताव मंजूर करू नये, अशी मागणी भाजप नगरसेवक करीत होते. मात्र यशवंत जाधव यांनी रस्तेदुरुस्तीचे पाच प्रस्ताव मंजूर केले. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप नगरसेवकांनी  घोषणाबाजी करीत सभात्याग केला.