प्रसाद रावकर

पालिकेचा पुनर्पृष्ठीकरणाचा घाट; रहिवाशांची पुनर्बाधणीची मागणी

दक्षिण मुंबईमधील हातगाडय़ा, दुचाकी आणि पादचाऱ्यांची वर्दळ असलेल्या तिसऱ्या कुंभारवाडय़ासमोरील डॉ. मित्रसेन माहीमतुरा मार्गाच्या पुनर्पृष्ठीकरणाचा घाट पालिकेने घातला आहे. असे असताना स्थानिक रहिवाशांनी या रस्त्यावरील मल आणि जलवाहिन्यांची कामे करून या रस्त्याची पुनर्बाधणी करण्याचा आग्रह धरला आहे. या वादात हा रस्ता पाच महिन्यांपासून खोदून ठेवण्यात आला असून, त्यामुळे वाहतुकीच्या समस्यांत भर पडली आहे.

दक्षिण मुंबईमधील नळबाजार परिसराजवळ असलेल्या डॉ. मित्रसेन माहीमतुरा मार्गावर नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. तिथे लोखंडाची अनेक दुकाने असून लोखंडी साहित्याची ने-आण करणाऱ्या हातगाडय़ांची सतत ये-जा सुरू असते. परिणामी, हा चिंचोळा रस्ता कायम गर्दीत हरवलेला असतो. या रस्त्यावर मध्येच अनधिकृतपणे कबुतरखाना उभारण्यात आला होता. तिथे येणाऱ्या कबुतरांचा रहिवाशांना प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे कबुतरखाना हटवावा, अशी मागणी रहिवाशांकडून सातत्याने होत होती.

दरम्यानच्या काळात डॉ. मित्रसेन माहीमतुरा मार्गाचे पुनर्पृष्ठीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याच्या पुनर्पृष्ठीकरणाचे काम हाती घेण्यात आले. पूर्वी या रस्त्यावर पडलेले खड्डे डांबराने बुजविण्यात आले होते. रस्त्यावरील मलनिस्सारण वाहिन्यांवरील मॅनहोल, जलवाहिनीचे चेंबर डांबराखाली गायब झाले होते. पुनर्पृष्ठीकरणाचे काम करण्यापूर्वी कंत्राटदाराने हा रस्ता खरवडून काढला त्यावेळी मॅनहोल आणि चेंबर दृष्टीस पडले. मॅनहोल रस्त्याखाली गाडली गेल्यामुळे या वाहिन्यांची सफाई करणेही अवघड झाले होते. परिणामी, या रस्त्यावरील इमारतींमधील शौचालये तुंबण्याचे प्रकार वारंवार घडत. या भागातील काही दुकानदारांनी मलनिस्सारण वाहिनीच पर्जन्य जलवाहिनीमध्ये वळविल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे इमारतींच्या लगत सांडपाण्याचे पाट वाहत आहेत. दरुगधी आणि डासांमुळे रहिवाशांच्या आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत आहेत. अधूनमधून दूषित पाणीपुरवठाही होतो. त्यामुळे रहिवासी हैराण झाले आहेत.

डॉ. मित्रसेन माहीमतुरा मार्गावरील मलनिस्सारण वाहिनी, जलवाहिनीची दुरुस्ती करून रस्त्याची पुनर्बाधणी करावी, असा आग्रह येथील रहिवाशांनी धरला आहे. त्यामुळे खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पुनर्पृष्ठीकरण करणे अवघड झाले आहे. रस्ता खाचखळग्यांनी भरला असून पादचाऱ्यांना विशेषत ज्येष्ठ नागरिक आणि बालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खड्डय़ांमुळे दुचाकीस्वरांना छोटय़ा-मोठय़ा अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

नागरिकांची मागणी लक्षात घेऊन पुनर्बाधणीचा विचार पालिका पातळीवर सुरू झाला आहे. मात्र ही कामे तात्काळ होणे अवघड आहे. पावसाळ्यानंतरच या कामांना मुहूर्त मिळू शकेल.

गेल्या ७० वर्षांमध्ये एकदाही येथील मलनिस्सारण वाहिनी, रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. केवळ डांबराने खड्डे बुजवले जातात. त्यामुळे रस्त्याचा स्तर वाढला आहे. पदपथ खाली गेले आहेत आणि मधला रस्ता उंच झाला आहे. त्यामुळे पुनर्पृष्ठीकरणाऐवजी हा रस्ता नव्याने बांधण्याची गरज आहे. मलनिस्सारण आणि जलवाहिन्यांची दुरुस्तीही गरजेची आहे.

– राजन गोरे, रहिवासी