शिक्षण क्षेत्रात प्रयोगशील काम करणाऱ्या जगातील दहा महत्त्वपूर्ण व्यक्तींमध्ये भारतामधून रॉबिन चौरसिया यांची निवड झाली आहे. कामाठीपुरातील देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांसाठी गेली पाच वर्षे ‘क्रांती’ संस्थेच्या माध्यमातून रॉबिन शाळा चालवीत आहे. समलैंगिक असल्याने अमेरिकेत हवाई दलामधील नोकरी त्यांना गमवावी लागली. त्यानंतर अमेरिका सोडून काही वर्षांपूर्वी त्या भारतात आल्या. कामाठीपुरातील मुलांसाठी काम करत असतानाच पुढे २०११ मध्ये ‘क्रांती’ नावाच्या संस्थेच्या माध्यमातून या कामाचा विस्तार करण्याचे ठरविले. देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या बऱ्याच स्वयंसेवी संस्था या मुलांना दुय्यम रोजगाराची कामे शिकवतात. त्यांच्या मते, ही मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत. म्हणून त्यांना किमान पोट भरण्यापुरते शिक्षण मिळवून देणे इतकेच ध्येय या संस्थांसमोर असते. परंतु, या विचारांच्या पलीकडे जाऊन काम करण्याची धमक रॉबिन यांनी दाखविली.
आज कामाठीपुरातील १८ मुली त्यांच्यासोबत एका घरात राहत आहेत. शाळेकरिता जागा नसल्याने या घरातच त्यांना शिक्षण दिले जाते. त्यांना अभ्यासाबरोबरच सिनेमा, संगणक, चित्रकला, योग, छायाचित्रण या गोष्टी शिकविल्या जातात. यामधील अध्ययन अक्षमता असलेल्या मुलींना शिकविण्याकरिता विशेष मुलांकरिता असलेल्या स्वतंत्र अध्ययन पद्धतींचा वापर केला जातो. कित्येक मुली शिक्षणाबरोबर अर्धवेळ नोकरीही करतात. त्यांना शिकण्याची आवड आहे. मात्र त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याची गरज आहे. येथील मुली साधारण १२ ते २० या वयोगटातील असून इतर संस्थांप्रमाणे त्यांना इथे बंदिस्त करून ठेवले जात नाही. येथे त्यांना स्वातंत्र्य असून मुली नवीन गोष्टी आनंदाने शिकतात.
इंग्लंडमधील ‘वर्की फाउंडेशन’ जागतिक शिक्षक पुरस्कार प्रदान करते. अंतिम यादीमध्ये भारत, केनिया, अमेरिका, पाकिस्तान, पॅलेस्टाइन, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, जपान, फिनलँड या देशांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी १४८ देशांमधून ८००० अर्ज आले होते. त्यापैकी अंतिम यादीसाठी १० मान्यवरांची निवड करण्यात आली. दुबई येथे १३ मार्च रोजी यामधील एका मान्यवराला जागतिक शिक्षक पुरस्कार देण्यात येणार असून यासाठी सुमारे ६.८४ कोटी इतकी या पुरस्काराची रक्कम आहे.