News Flash

शालेय बसगाडय़ांच्या सुरक्षा तपासणीचा फार्स!

अनेक शालेय बसगाडय़ात आग प्रतिबंधक व्यवस्था नाही. काही गाडय़ांमध्ये प्रथमोपचार पेटी नावापुरती आहे.

छोटा बॉक्स म्हणजे प्रथमोपचार पेटी आहे.

प्रथमोचार पेटी नावापुरती;आग प्रतिबंधक यंत्रणाही गायब
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित व्हावी, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे बसगाडय़ांची तपासणी होत असली तरी ही तपासणी फार्सच ठरण्याची शक्यता आहे. कारण, स्कूल बस गाडय़ांकरिता ठरवून दिलेल्या सुरक्षा नियमावलीतील अनेक महत्त्वाच्या बाबींकडे डोळेझाक करत या गाडय़ांना रस्त्यावर उतरण्याची परवानगी दिली जात आहे.
अनेक शालेय बसगाडय़ात आग प्रतिबंधक व्यवस्था नाही. काही गाडय़ांमध्ये प्रथमोपचार पेटी नावापुरती आहे. परंतु, या बाबींकडे डोळेझाक करत गाडय़ांना विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी योग्य ठरविले जात आहे. या बस गाडय़ांची सुरक्षा तपासणी झाल्याशिवाय त्या रस्त्यावर आणू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार स्कूल बस गाडय़ांची तपासणी तेजीत सुरू झाली खरी, मात्र प्रादेशिक परिवहन कार्यालयात मनुष्यबळ अपुरे असल्याने बसगाडय़ांची थातुरमातुर तपासणी केली जात आहे.
सध्या मुंबई व उपनगरात ९ हजार स्कूल बस गाडय़ा रस्त्यावर धावत आहेत. त्यातील ५० टक्क्य़ांहून अधिक बस गाडय़ांची तपासणी बाकी आहे. येत्या काही दिवसांत शाळा सुरू होत असल्याने अनेक बस गाडय़ांची तपासणीशिवायच रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. यात सुरक्षेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या उपाययोजनाही गाडीत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
परिवहन महामंडळाने दोन महिन्यांपूर्वी खाजगी बसेसना तपासणीचे आवाहन केले होते. यावेळी ज्या बसेस आमच्यापर्यंत पोहोचल्या त्यांची तपासणी करण्यात आली आहे. दरवर्षी शालेय खाजगी बसेसची योग्यता तपासणी केली जाते. मात्र न्यायलयाच्या आदेशानुसार ज्यांना सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे त्यांचीही पुर्नतपासणी करण्यात येत आहे. सध्या आमच्याकडे ४५ टक्के बसेसची तपासणी करण्यात आली आहे. आणि ही तपासणी मोफत असून अजूनही ही प्रक्रिया सुरू आहे. काही बस मालक तपासणी करण्यासाठी विरोध दर्शवित आहेत. मात्र कायद्याच्या चौकटीत राहून बस मालकांनी सामाजिक बांधिलकी पाळावी, असे ताडदेव प्रादेशिक परिवहन विभागाचे सहआयुक्त गोविंद सैदाणे यांनी सांगितले.
पुनर्तपासणीची गरज काय?
एप्रिल आणि मे या दोन महिन्यात सुटीचा कालावधी असल्याने बस वाहनचालक गावी गेल्याने बस गाडय़ांची तपासणी राहिल्याचे ‘स्कुल बस ओनर्स असोसिएशन’चे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले. तर ज्यांना मोटर वाहन कायद्यानुसार यापूर्वीच फिटनेस प्रमाणपत्र दिले गेले आहेत त्यांना पुनर्तपासणीची गरज काय, असा प्रश्न गर्ग यांनी उपस्थित केला आहे.

खाजगी बसेस योग्यता प्रणापत्राच्या नियमावली
’ वाहनांची नोंदणी, योग्यता, विमा, परवाना, वायू प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्रांची तपासणी.
’ अग्निशमन आणि प्रथमोपचार पेटी आवश्यक
’ केवळ शाळेतील मुलांची ने-आण केल्या जाणाऱ्या बसेसना पिवळा रंग देण्यात येईल. वाहनांच्या पुढच्या आणि मागील बाजूला स्कुल बस असे लिहिलेले असावे.
’ स्कुल बस म्हणून वापरण्यात येणारी बस नोंदणीच्या दिनांकापासून ८ वर्षांहून अधिक जुनी असू नये.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2016 3:02 am

Web Title: rto ignore important aspects during school buses inspection
टॅग : Rto,School Buses
Next Stories
1 ‘हँकॉक’ला १४ जूनपर्यंत पर्याय सुचवा!
2 इमारत रिकामी करण्यास बीआयटी चाळीतील रहिवाशांचा विरोध
3 मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग अपघात उपाययोजनेसाठी ई-मेल मोहीम
Just Now!
X