लालबागच्या राजासमोर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. पोलीस आणि कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. गर्दीला आवरत असताना खजिनदार मंगेश दळवी यांना पोलिसांचा धक्का लागल्याने हा वाद निर्माण झाला. दर्शनाच्या ठिकाणी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने पोलीस गर्दीवर नियंत्रण मिळवत असताना हा धक्का लागला होता. दोघेही अगदी हमरी-तुमरीवर आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दिवसाला हजारोंच्या संख्येने लोक तासनतास रांगेत उभे असतात. येथे होणारी लोकांची गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात असतो. सोबतच कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात.

याआधीही काही वेळा कार्यकर्त्यांकडून भक्तांना मिळणाऱ्या वागणुकीवरुन लालबागच्या राजा मंडळावर टीका झाली होती. २०१३ रोजी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहणाऱ्या गणेशभक्तांना मिळणारी उद्धट वागणूक आणि कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या धक्काबुक्कीची गृहविभागाने गंभीर दखल घेत भक्तांना अवमानास्पद वागणूक देणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे आदेश तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलिसांनी दिले होते.

पोलिस उपनिरीक्षक अशोक सरमळे यांना कार्यकर्त्यांडून त्यावेळी धक्काबुक्की झाली होती. सरमाळे यांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर मनोज मिश्रा या कार्यकर्त्यांला अटक करण्यात आली होती.