आर्थिक अडचणींत सापडलेल्या रूपी सहकारी बँकेच्या विलीनीकरणासाठी आता राष्ट्रीयीकृत बँकाही सरसावल्या आहेत. या बँकेच्या विलीनीकरणाबाबत सारस्वत बँकेने दिलेला प्रस्ताव रिझव्‍‌र्ह बँकेकडे प्रलंबित असतानाच अलाहाबाद बँकेनेही ही बँक ताब्यात घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांच्या या प्रस्तावास रिझव्‍‌र्ह बँकेनेही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने रूपी बँकेचे अलाहाबाद बँकेत विलीनीकरण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सुमारे एक लाख ठेवीदार आणि १४०० कोटींच्या ठेवी असलेल्या रूपी बँकेच्या संचालकांनी मनमानीपणे ८०० कोटींचे कर्जवाटप केले होते. त्यात बँकेला तब्बल ३०० कोटींचे नुकसान झाल्याने ही बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे या बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने प्रशासक नेमला असून या ठेवीदारांच्या हितासाठी या बँकेचे अन्य बँकेत विलीनीकरण करण्यात येणार आहे. या बँकेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव सप्टेंबर २०१३ मध्ये सारस्वत बँकेने दिला आहे. त्यानुसार एक लाखाच्या वर ठेवी असलेल्यांना ६५ टक्के परतावा देण्याची तयारी या बँकेने दाखविली आहे. सध्या हा प्रस्ताव रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.
अशातच अलाहाबाद बँकेने रूपी बँक ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या बँकेच्या संचालक मंडळाने तसा ठरावही केला असून रूपीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव देत ‘डय़ू डिलिजन्स’चेही पत्र दिले आहे. मात्र त्याबाबत रूपी बँकेने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र हे ‘डय़ू डिलिजन्स’ अलाहाबाद बँकेला त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश रिझव्‍‌र्ह बँक आणि राज्य सरकारने रूपीच्या प्रशासकांना दिले आहेत. रूपीच्या माध्यमातून राज्यात जाळे पसरविण्याची अलाहाबाद बँकेची योजना असून त्यांची आर्थिक स्थितीही चांगली असल्याने या राष्ट्रीयीकृत बँकेच्या ताब्यात रूपी बँक देण्याच्या हालचाली रिझव्‍‌र्ह बँकेत सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.