मुंबई पोलीस दलातील सर्वच महत्त्वाच्या प्रकरणांचे तपास अधिकारी असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची आतापर्यंतची कारकीर्द वादग्रस्तच ठरली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली मोटार सापडल्याप्रकरणातही तपास अधिकारी असलेल्या वाझे यांच्या कथित संबंधांमुळे ते पुन्हा वादात सापडले आहेत.

१९९०च्या तुकडीतील वाझे यांनी आपली कारकिर्द गडचिरोलीतून सुरू केली. अल्पावधीतच ते ठाण्यातील चकमकफेम अधिकारी ठरले. त्यामुळेच मुंबई गुन्हे अन्वेषण विभागात त्यांचा मार्ग सुकर झाला. परंतु घाटकोपर बॉम्बस्फोटातील संशयित ख्वाजा युनुस याच्या हत्येप्रकरणी त्यांना निलंबित  करण्यात आले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ते पुन्हा पोलीस दलात येण्याची शक्यता मावळली. मात्र जून २०२० मध्ये त्यांना पुन्हा सेवेत घेतले गेले. त्यांची थेट नियुक्ती विशेष गुन्हे अन्वेषण अधिकारी म्हणून केली गेली. टीआरपी घोटाळा असो वा अमली पदार्थ तस्करी आदी महत्त्वाच्या प्रकरणांचे तेच तपास अधिकारी म्हणून नियुक्त झाले. रिपब्लिकन टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसाठी आलेल्या रायगड पोलिसांच्या मदतीसाठीही वाझे यांनाच पाठविण्यात आले होते.