‘बाल साहित्य-नवी आव्हाने’ वर चर्चा
साहित्य अकादमीतर्फे ‘बाल साहित्य-नवी आव्हाने’ या विषयावर १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय संमेलनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे १४ नोव्हेंबर रोजी बाल साहित्य पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
रविवार, १५ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार असून साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक व साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे संयोजक भालचंद्र नेमाडे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यानंतर बोडो, गुजराथी, हिंदूी, कोकणी, मराठी, उर्दू यांचे काव्यवाचन होणार आहे. साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कवार यांच्या भाषणाने पहिल्या दिवसाचा समारोप होणार आहे.
दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ११.३० आणि दुपारी १२ ते १.३० या वेळेत अनुक्रमे मराठीसह आसामी, हिंदूी, मल्याळम, बंगाली, गुजराती, मणिपुरी या भाषेतील निबंध सादरीकरण होणार आहे. दोन्ही सत्रांना अनुक्रमे अनंत भावे व इरा नटरासन हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. दुपारी २.३० ते ४ या वेळेत गुजराती, काश्मिरी, कोकणी, मराठी, पंजाबी, राजस्थानी, संस्कृत, सिंधी, तेलुगू या भाषेतील कविता सादर होणार आहेत. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे २०१५ या वर्षांतील साहित्य अकादमीच्या बाल साहित्य पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. कार्यक्रमास साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी हे अध्यक्ष, तर गुजराती साहित्यिक चंद्रकांत शेठ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता पुरस्कारप्राप्त साहित्यिकांशी संवाद साधला जाणार असून साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कवार हे अध्यक्षस्थानी असतील.