मुंबईत दरवर्षी अनेक साई मंडळे मुंबई ते शिर्डी पदयात्रा आणि साई भंडाऱ्याचे आयोजन करत असतात. या मंडळांप्रमाणेच मुंबईत एक कुटुंब गेल्या ९९ वर्षांपासून साई पुण्यतिथी उत्सव मोठया उत्साहात साजरा करत आहे. दरवर्षी शिर्डीत विजयादशमीला साई पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो. यावेळी देशभरातून लाखो भाविक बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात.

शिर्डी प्रमाणेच मुंबईतही लालबागमधल्या खटाव बिल्डिंगमध्ये कै. लक्ष्मण चव्हाण यांच्या घरात गेल्या ९९ वर्षांपासून साई पुण्यतिथीचा उत्सव साजरा केला जातोय. विजयादशमीच्या दुसऱ्यादिवशी प्रवचन, कीर्तन आणि भंडाऱ्याच्या रुपाने चव्हाण कुटुंबिय साई पुण्यतिथी साजरी करतात.यंदाच्या १९ ऑक्टोंबरला या पुण्यतिथी उत्सवाला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत. कै. लक्ष्मण चव्हाण मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मालवणचे.

रेल्वेमध्ये नोकरी करताना वाडीबंदर येथे सिग्नल दाखवताना रेल्वे क्रॉसिंगवर एका अज्ञाताने त्यांना अपघातातून वाचवले. त्यानंतर एका व्यक्तीच्या सांगण्यावरुन ते शिर्डीला गेले. त्यावेळी त्यांना साईबाबांनी दृष्टांत दिला असे सांगितले जाते. त्यानंतर लक्ष्मण चव्हाण यांनी स्वत:ला पूर्णपणे साईसेवेला वाहून घेतले. आता त्यांची पाचवी पिढी त्यांची परंपरा पुढे चालवत आहे.