मुंबईच्या कांदिवली भागातील साईधाम मंदिराच्या विश्वस्त मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाकडे साईबाबांचा अपमान आणि बदनामी करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. त्याचवेळी साईबाबा हे मुस्लिम नसून ब्राम्हण असल्याचाही दावा या मंदिराच्यावतीने करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी साईबाबा हे मुस्लिम असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे साईबाबांचे अनुयायी आणि भक्तांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत, साईधाम मंदिराचे विश्वस्त रमेश जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेत श्री साईबाबा संस्थानाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘श्री साई सतचरित्र’ या ग्रंथाचा दाखला देण्यात आला आहे. साईभक्तांसाठी पवित्र असणाऱ्या या ग्रंथात पाथरी गावात राहणारे साईबाबा मुस्लिम असल्याचा उल्लेख कुठेही आढळत नाही. मुळात साईबाबा हे ब्राम्हण घराण्यात जन्माला आले असून, त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना एका मुस्लिम फकीराकडे सोपविल्याचा उल्लेख ग्रंथात असल्याचे न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
मात्र, सरस्वती आणि त्यांच्या समर्थकांनी साईबाबांच्या विरोधात अपमानकारक आणि बदनामीकारक वक्तव्ये करत, साईबाबा देव किंवा संत नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे मुस्लिम आणि हिंदुंनी त्यांच्या अनुनय करू नये, असे सरस्वती यांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मुळात शिर्डी येथील साई संस्थानाने सरस्वती यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी याविरोधात कोणतीही भूमिका न घेतल्याने साईधाम मंदिराला न्यायालयाची पायरी चढावी लागल्याचे याचिकेत सांगण्यात आले आहे.