निशांत सरवणकर

बांधकाम उद्योग हळूहळू सावरत असतानाच सध्याच्या टाळेबंदीमुळे त्याला आळा बसला आहे. पुढील तीन-चार महिने तरी हा उद्योग सावरण्याची शक्यता वाटत नसताना या काळातही ५०० घरांची ऑनलाइन विक्री झाली आहे.

या परिस्थितीतही आपण घरे विकू शकतो, हे ‘गोदरेज प्रॉपर्टीज‘ने दाखवून दिले आहे.  बांधकाम उद्योगातील विविध घडामोडींवर नजर ठेवणाऱ्या ‘अ‍ॅनारॉक प्रॉपर्टीज‘ने याबाबतचा अहवाल उपलब्ध केला आहे. त्यानुसार ‘गोदरेज प्रॉपर्टीज‘ने मार्च महिन्याच्या दुसऱ्या टप्प्यात ५०० घरांची विक्री केली. याच काळात देशभरात टाळेबंदी लागू झाली होती.  या काळात देशभरातील विकासकांनी ऑनलाइनच्या मार्गाने घरांची विक्री सुरू केल्याने किमान १५ ते २० टक्के व्यवसाय झाला आहे. याबाबत ‘गोदरेज प्रॉपर्टीज‘ने म्हटले आहे की, आम्ही सुरूवातीपासूनच ऑनलाइन विक्रीवर भर देऊन आहोत. त्याचा फायदा आम्हाला टाळेबंदीच्या काळात झाला. घर खरेदीसाठी इच्छुक असलेल्यांशी आम्ही सतत संपर्कात होतो. त्यामुळेच आम्हाला टाळेबंदीच्या काळातही व्यवसाय करता आला.

२० एप्रिलपासून ज्या ठिकाणी मजुरांचे वास्तव्य आहे त्या ठिकाणी बांधकामाला सुरुवात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात हालचाली सुरू होणार आहेत. अर्धवट रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर विकासकांकडून भर दिला जाणार आहे. २६ एप्रिल रोजी येणाऱ्या अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांना डिजिटल घरविक्रीद्वारे आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे ‘प्लॅटिनम कॉर्प‘चे संचालक विशाल रतनघायरा यांनी सांगितले.  डी. एन. नगरात म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास करणाऱ्या प्लॅटिनम कॉर्पनेही २० एप्रिलनंतर आपली अर्धवट कामे पूर्ण करण्यावर भर दिला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाइन पर्यायांचा वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

करोनामुळे विकासकांना आता नेहमीपेक्षा वेगळे  मार्ग शोधावे लागणार आहेत. बडय़ा विकासकांना त्यांच्या नावाचा फायदा होतो आणि ऑनलाइन विक्री होऊ शकते. परंतु सर्वच विकासकांना आता या मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. व्हिडिओद्वारे घटनास्थळाची भेट अशी संकल्पना रुजवावी लागणार आहे, याकडे ‘नॅशनल रिएल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल‘चे (नरेडको) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी लक्ष वेधले.

झाले काय?

गेल्या चौथ्या तिमाहीत ‘गोदरेज प्राॉपर्टीज‘ने तब्बल तीन हजार घरांची विक्री केली. त्यापैकी १७ टक्के म्हणजे ५०० घरे मार्चच्या दुसऱ्या टप्प्यात विकली गेल्याचे ‘अ‍ॅनारॉक प्रॉपर्टीज‘चे संशोधन प्रमुख व संचालक प्रशांत ठाकूर यांचे म्हणणे आहे. करोनामुळे आता विकासक ऑनलाइन विक्रीकडे वळले आहेत. त्याशिवाय त्यांना पर्याय नाही, असे त्यांनी नमूद केले.