वांद्रे येथे राहणाऱ्या गौरांगो कुंडू या सलमानच्या चाहत्याने शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या परिसरातच आत्महत्येचा प्रयत्न केला. न्यायालयाबाहेर त्याने गर्दीतील काहींना आपल्याकडील पत्रके वाटली. या पत्रकानुसार गौरांगो एक होतकरू लेखक असून त्याला चंदेरी दुनियेत आपले नशीब आजमावायचे होते. त्यासाठी सलमानच त्याला मदत करू शकत होता. गौरांगो त्याने लिहिलेल्या संहिताही सलमानला सातत्याने पाठवत होता. मात्र, सलमानचा जामीन मंजूर न झाल्यास त्याच्या स्वप्नांना वालीच उरणार नव्हता. या विचारातूनच त्याने उच्च न्यायालयाबाहेर विष पिऊन आपला जीव देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.