नगरविकास विभागाच्या उच्चपदस्थांचे सूतोवाच

मुंबई : आतापर्यंत ना विकास क्षेत्रात असलेली मिठागरांची १३० हेक्टर जमीन मुंबई महानगरपालिकेने आपल्या विकास आराखडय़ात परवडणाऱ्या घरांसाठी मोकळी केल्याचे जाहीर केले असले तरी घरांच्या बांधकामांसाठी ती सहजासहजी उपलब्ध होईलच याची खात्री नसून त्यात केंद्र सरकारच्या मंजुरीसह काही अन्य कायदेशीर बाबींमुळे अडचणी येऊ शकतात, असे सूतोवाच नगरविकास विभागातील उच्चपदस्थांनी दिली.

मुंबईचा विकास आराखडा बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यात मिठागरांच्या जमिनीपैकी सीआरझेडमध्ये न येणाऱ्या ७२१ हेक्टर क्षेत्रापैकी १३० हेक्टर जमीन बांधकामासाठी खुली करण्यात आली आहे.  मिठागरांची जमीन मुंबई महानगरपालिकेने बांधकामांसाठी खुली करण्याचे जाहीर केले असले तरी त्यात अनेक अडचणी आहेत. यातील अनेक जमिनी या भाडेपट्टीवर आहेत. त्यात केंद्र सरकारची जमीन खासगी व्यक्तीने भाडेपट्टीने दिली, खासगी व्यक्तीने आपली जमीन भाडेपट्टीने सरकारला दिली, असे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे या जमिनी बांधकामासाठी मिळणे सोपे नाही.  मुंबई महानगरपालिकेच्या या निर्णयाविरोधात  न्यायालयात गेल्यास वाद होऊ शकतो, असेही सांगण्यात आले.  परिणामी केवळ मुंबई महानगरपालिकेने विकास आराखडय़ात त्या ना विकास क्षेत्रातून बाहेर काढत घरांसाठी खुल्या केल्या म्हणून मिठागरांच्या जमिनीवर नजीकच्या भविष्यात घरांची बांधणी सुरू होण्याची शक्यता कमी आहे, असे नगरविकास विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.