शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाची भाषा निवडणुकीपूर्वी करणारे मित्रवर्य अफझलखानाचा ‘महाराष्ट्र तोडो’ विडा का रंगवत आहेत? मुख्यमंत्री, महाराष्ट्र ही तुमची आई आहे. तिच्याही इभ्रतीचे गांभीर्याने पाहा, असा टोला  शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना हाणला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्यावर टीका करतानाच त्यांना पाठिशी घालणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही शिवसेनेने टोला मारला.
पत्नी अमृता फडणवीस यांच्याविरुद्ध आरोप करणा-या दिग्विजय सिंह यांना नोटीस पाठवून पंधरा दिवसांत माफी मागण्यास सांगणारे, स्वत:च्या प्रतिमेबाबत इतके भावूक व संवेदनशील असलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राची बदनामी सुरू असताना याच कारवाईचा बडगा का उगारीत नाहीत? असा सवालही शिवसेनेने विचारला आहे. अग्रलेखात म्हटलंय की, मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविरुद्ध दिग्विजय यांनी केलेल्या आरोपामुळे अस्वस्थ होऊन मुख्यमंत्र्यांनी दिग्विजय सिंह यांना नोटीस पाठवून पंधरा दिवसांत माफी मागण्यास सांगितले. ते योग्यच झाले. प्रश्न इतकाच की, स्वत:च्या प्रतिमेबाबत इतके भावूक व संवेदनशील असलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राची बदनामी सुरू असताना याच कारवाईचा बडगा का उगारीत नाहीत? मुख्यमंत्र्यांनीच नेमलेले अ‍ॅडव्होकेट जनरल श्रीहरी अणे हे रोज उठून महाराष्ट्राची बेअब्रू करीत आहेत. विदर्भ तोडा असे म्हणता म्हणता मराठवाडाही महाराष्ट्रापासून तोडा, असे म्हणू लागले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कसे काय सहन करू शकतात? अमृतावहिनी या त्यांच्या पत्नी आहेत, पण महाराष्ट्र त्यांची आई आहे. आईचा अपमान करणे हे मुख्यमंत्र्यांना चालत असेल तर ही विदर्भाची संस्कृती अजिबात नाही. श्रीहरी अणे नामक फालतू माणूस महाराष्ट्राच्या अ‍ॅडव्होकेट जनरलपदी नेमून मुख्यमंत्र्यांनी काही बरे केले नाही. शिवाय महाराष्ट्राच्या बाबतीत हा अणे इतक्या माकडचेष्टा करूनही मुख्यमंत्री त्याच्या बाबतीत इतके हळवे राहतात हे काही खंबीर राज्यकर्त्याचे लक्षण नाही, असे आम्हाला दुर्दैवाने म्हणावे लागते, असे अग्रलेखात म्हटले आहे.