मुंबई : पत्रकारिता-छायाचित्रांसाठी राज्य सरकारतर्फे देण्यात येणारे २०१८ चे पुरस्कार जाहीर झाले असून मुंबई विभागाचा आचार्य अत्रे पुरस्कार ‘लोकसत्ता’चे विशेष प्रतिनिधी संजय बापट यांना तर कोकण विभागासाठीचा शि.म. परांजपे पुरस्कार कल्याण-डोंबिवली प्रतिनिधी भगवान मंडलिक यांना जाहीर झाला आहे.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात शनिवार २७ जुलै रोजी होणाऱ्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील. या समारंभात २०१६ आणि २०१७ या वर्षांसाठीचे पत्रकारिता पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. ‘महाराष्ट्र माझा शेतकरी राजा’ लघुचित्रपट स्पर्धा २०१६ आणि ‘महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा’ २०१७ आणि २०१८ यातील विजेत्यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येतील.

माहिती आणि जनसंपर्क विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिला जाणारा शासकीय गटातील यशवंतराव चव्हाण पुरस्कार (राज्यस्तर) हा मंत्रालयातील विभागीय संपर्क अधिकारी डॉ. सुरेखा मुळे यांना जाहीर झाला आहे. तसेच छायाचित्रकारांना देण्यात येणारा शासकीय गटातील केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) हा अमरावती विभागीय माहिती कार्यालयातील चंद्रकांत पाटील यांना जाहीर झाला आहे. ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार : पत्रकारितेतील योगदानाबद्दल देण्यात येणारा २०१८ या वर्षांसाठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पत्रकार यमाजी मालकर यांना पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेखन पुरस्कार जाहीर करण्यात आला. ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.