विद्यार्थ्यांना सर्वाधिक मनस्ताप देणाऱ्या विद्यापीठाच्या ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या अंमलबजावणीत झालेल्या घोळावर टीका होत असतानाच मुंबई विद्यापीठात बुधवारी पार पडलेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत हा पथदर्शी निर्णय घेतल्याबद्दल कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला आहे. विद्वत परिषदेच्या या ठरावामुळे विद्यापीठ वर्तुळात वेगळय़ाच चर्चेला उधाण आले आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी या शैक्षणिक वर्षांपासून सर्वच अभ्यासक्रमांचे मूल्यांकन ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणीत झालेल्या घोळामुळे विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाले. कुलपती चे. विद्यासागर राव यांनी या सर्व गोंधळाला जबाबदार धरत डॉ. देशमुख यांना खडे बोल सुनावत सक्तीच्या रजेवरही पाठविले. यानंतर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला. त्याचबरोबर प्रभारी प्र-कुलगुरू, प्रभारी परीक्षा नियंत्रकांचीही नियुक्ती करण्यात आली. या चमूने सर्व अभ्यासक्रमांचे निकाल लावले. मात्र हे सर्व होईपर्यंत बराच उशीर झाला होता. या प्रक्रियेतून लागलेल्या निकालांमधील आणखी गोंधळ समोर येत आहेत. असे असतानाच शुक्रवारी पार पडलेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत डॉ. देशमुख यांनी घेतलेला ऑनस्क्रीन मूल्यांकनाचा निर्णय हा पथदर्शी असल्याने त्यांचे अभिनंदन करणारा ठराव संमत करण्यात आला आहे.

डॉ. देशमुख यांनी हा निर्णय विद्वत परिषदेतच घेतला होता. त्यांचा हा निर्णय पथदर्शी आहे तसेच त्यांच्या उपस्थितीत विविध अडचणींवर मात करत तब्बल बारा लाख उत्तरपत्रिकांचे ऑनस्क्रीन मूल्यांकन करण्यात आले. यामुळे विद्वत परिषद त्यांच्या मागे आहे असे सांगत हा ठराव संमत करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. एवढा गोंधळ होऊनही हा निर्णय कायम ठेवण्याचे धाडस दाखविल्याबद्दल डॉ. देशमुख यांच्यासोबतच कुलपती आणि मुख्यमंत्र्यांच्याही अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आल्याचे समजते. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे डॉ. देशमुख यांचा निर्णय योग्य असून त्यांनी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे अधोरेखित झाले आहे.

सध्याच्या गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर असा ठराव संमत करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उपस्थित केला जात आहे. या ठरावामुळे डॉ. देशमुख पुन्हा कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारणार का, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

परीक्षा शुल्कासंदर्भात पुनर्विचार

डॉ. देशमुख यांच्या निर्णयामुळे आज लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियाही रखडली आहे. इतकेच नव्हे तर काही उत्तरपत्रिकाही हरविलेल्या आहेत. हे सर्व गोंधळ असताना कुलगुरू देशमुख यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणे अपेक्षित होते. ते त्यांनी केले नाही. त्याचबरोबर कुलपतींनीही त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित असताना अशा प्रकारे अभिनंदनाचा ठराव संमत करणे पूर्णपणे चुकीचे आहे. या ठरावाला आमचा पूर्ण विरोध असून हा ठराव कोणत्या एखाद्या राजकीय पक्षाच्या दबावाखाली घेण्यात आला आहे.  प्रदीप सावंत, माजी अधिसभा सदस्य (युवासेना)

परीक्षा शुल्कासंदर्भात पुनर्विचार

  • वाढीव परीक्षा शुल्कासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने पुनर्विचार करण्याचा निर्णय विद्वत परिषदेत घेण्यात आला आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने यंदापासून ऑनस्क्रीन मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला.
  • या निर्णयाची घोषणा जुलैमध्ये केली असली तरी महाविद्यालयांनी पूर्वकल्पना न देता त्याची अंमलबजावणी अचानकपणे सुरू केल्याने अनेकांचा त्याचा फटका बसत होता. काही दिवसांपूर्वीच काही विद्यार्थी संघटनांनी याविरोधात आंदोलन पुकारले होते, तर काहींनी पथनाटय़ करत हा प्रश्न विद्यापीठासमोर मांडला होता. या सर्वाचे पडसाद बुधवारी पार पडलेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत उमटले. या वाढीव शुल्कानुसार सहाशे रुपये असलेले शुल्क थेट एक हजार रुपयांपर्यंत करण्यात आले होते, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शुल्क १२०० ते १५०० पर्यंत वाढविण्यात आले होते. या निर्णयावर सर्व शाखांच्या अधिष्ठातांना पुनर्विचार करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.