महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईत होतंय. या महाअधिवेशनात चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष व अभिनेते संजय नार्वेकर यांनी ‘सांस्कृतिक महाराष्ट्र’ हा ठराव मांडला. यावेळी संजय नार्वेकरांनी राज ठाकरेंचा ‘जाणता राजा’ असा उल्लेख केला. “मध्यमवर्गीय स्तरातून वर आलेल्या माझ्यासारख्या अनेक कलावंतांना स्वस्त दरात, नियमाने परडवणारी घरं मिळावीत म्हणून स्वत: राजसाहेबांनी पाठपुरावा केला. असा मराठी कलाकारांच्या पाठीशी ठाम उभा राहणारा हा नेता आहे”, अशा शब्दांत नार्वेकरांनी स्तुती केली.

संजय नार्वेकरांनी मांडलेल्या ठरावात कलाकारांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे होते. याचसोबत गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा विषयही त्यांनी प्रकाशझोतात आणला. “गडकिल्ले संवर्धन, नाट्यगृहांची अवस्था सुधारावी, प्रायोगिक रंगभूमी जोपासणं आणि ती वृद्धिंगत करणं गरजेचं, मराठी चित्रीकरणासाठी एक खिडकी परवानगी कक्ष स्थापन व्हावा आणि मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळालाच पाहिजे, त्यासाठी आम्ही कार्यरत राहू”, असं ते म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलं आहे. आज राज ठाकरे आपली भूमिका मांडणार असून ते काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.