काँग्रेसचा इशारा; जोगेश्वरीत पक्षातर्फे आंदोलन

मुंबई : पावसाच्या तडाख्यात मुंबईतील रस्त्यांची चाळण झाली आहे. मात्र मुंबईत फक्त ३०० खड्डे असल्याचे पालिकेने न्यायालयाला सांगितले आहे. ही पालिकेची बनवाबनवी असून रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमुळे एकाचा जरी बळी गेला तर मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख, महापौर आणि पालिका आयुक्तांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी ‘खड्डे मोजा आणि बुजवा’ आंदोलनात केली.

मुंबई काँग्रेसने रविवारी वीरा देसाई रोड, जोगेश्वरी (प.) येथे ‘खड्डे मोजा आमि बुजवा’ आंदोलन केले. त्या वेळी ते बोलत होते.

देशीची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले आहेत, पण पालिका मात्र ३०० खड्डे असल्याचा दावा करीत आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसने खड्डे मोजण्याची आणि ते बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत केलेल्या पाहणीनुसार रस्त्यांवर तब्बल २० हजार खड्डे पडले आहेत. खड्डय़ांमुळे कोण दगावले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा निरुपम यांनी या वेळी बोलताना दिला.

शीत डांबरमिश्रित खडीची (कोल्डमिक्स) कमतरता असल्यामुळे खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने आता पेव्हर ब्लॉकचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. मात्र पेव्हर ब्लॉक अतिशय धोकादायक असून त्यामुळे नव्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. हे पालिकेचे अपयश आहे. पालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या शिवेसना-भाजपनेच मुंबईची वाट लागली आहे, असा आरोप संजय निरुपम यांनी केला.

मुंबईमध्ये १९०० कि.मी. लांबीचे रस्ते असून त्यापैकी १,२७५ कि.मी. लांबीचे रस्ते पालिकेच्या अखत्यारित आहेत. पण पालिकेला हे रस्ते सुस्थितीत ठेवता आलेले नाहीत, असेही ते म्हणाले.