केंद्रीय पदपथ विक्रेते अधिनियमामध्ये तरतूद नसल्यामुळे फेरीवाला क्षेत्रामध्ये महिला बचत गटासाठी जागा राखून ठेवण्याचा नगरसेवकांनी मंजूर करुन आयुक्तांकडे पाठविलेला प्रस्ताव प्रशासनाने फेटाळून लावला आहे. परिणामी, पदपथावर फेरीवाल्यांप्रमाणे आपल्यालाही हक्काची जागा मिळण्याची महिला बचत गटाची आशा मावळली आहे. दरम्यान, प्रशासनाच्या निर्णयाविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला आहे.
मुंबईमध्ये सुमारे ५०० महिला बचत गट कार्यरत असून या बचत गटांच्या माध्यमातून एक लाख गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. मालाला बाजारपेठ मिळत नसल्याने आपल्याला पालिकेने जागा उपलब्ध करावी, अशी मागणी बचत गटाकडून करण्यात येत होती.
ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक अनिल पाटणकर यांनी ‘फेरीवाला क्षेत्रा’त महिला बचत गटांना जागा देण्याची मागणी केली होती. ही ठरावाची सूचना सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजूर करुन पालिका आयुक्तांकडे पाठविली होती.