ढोल-ताशांचा गजर.. एकामागून एक निघणाऱ्या आरोळ्या.. या साऱ्या गोष्टींमुळे एकच उत्साह संचारला होता.. पहाटेचे साडे पाच वाजले असले तरी रवींद्र नाटय़ मंदिर सळसळत्या उर्जेत न्हाऊन निघत होते.. याला कारण होते एकांकिका स्पर्धेसाठी पंढरीची वारी ठरलेल्या सवाई एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीचे.. प्रेक्षक पसंतीची घोषणा झाली आणि मुंबईच्या महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या ‘बत्ताशी’ एकांकिकेने आपले खाते उघडले.. पण जेव्हा प्रथम क्रमाकांच्या पारितोषिकाची घोषणा करण्याची वेळ आली तेव्हा मात्र कोणताच अंदाज लावता येत नव्हता.. कारण या वर्षी सवाईच्या अंतिम फेरीतील सात एकांकिकांचे विषय, संकल्पना, सादरीकरण यामध्ये कमालीची विविधता होती. त्यामुळेच परीक्षकांची ही खऱ्या अर्थाने परीक्षाच होती. यंदाची सवाई कोण ठरणार याची उत्सुकता ताणली गेली होती.. प्रेक्षकांनी आपले मत नोंदवलेच होते, त्यावर परीक्षकांनीही शिक्कामोर्तब केल्यामुळे बत्ताशीने बाजी मारली आणि महाविद्यालयाच्या युवा नाटय़कर्मीनी रंगमंच दणाणून सोडला. प्रेक्षक आणि परीक्षक या दोघांनाही भुरळ पाडणाऱ्या बत्ताशीची गोडी यावेळी सवाईमध्ये पाहायला मिळाली. या एकांकिकेने एकूण पाच पारितोषिकांसह आम्हीच सवाई असल्याचे दाखवून दिले.
बत्ताशी ही फाळणीच्या वेळची गोष्ट. ज्येष्ठ लेखक प्र.के. अत्रे यांच्या कथेवर आधारित असलेली ही एकांकिका सिनेमॅटिक अंगाने गेली. पाकिस्तानमधील एका कोठय़ावरील वेश्या असलेल्या बत्ताशीची ही कहाणी. वेश्या असली तरी तिला असलेला देशाचा आणि धर्माचा अभिमान या एकांकिकेचा विषय होता. पाकिस्तानातून भारतात येत असताना पाकिस्तानच्या सेनादलातील एक कप्तान बत्ताशीकडून शरीरसुखाची मागणी करतो आणि ते न मिळाल्यास गाडीतील अन्य लोकांना जीवे मारण्याची धमकी देतो. श्रीकृष्णाची भक्त असलेली बत्ताशी नेमके काय करते, हे या एकांकिकेमधून दाखवण्यात आले. सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक आणि वैभव मांगले यांनी अंतिम फेरीत परीक्षण म्हणून काम पाहिले.
सविस्तर निकाल
सवाई एकांकिका प्रथम आणि प्रेक्षक पसंती : बत्ताशी (महर्षी दयानंद महाविद्यालय, मुंबई), सवाई एकांकिका द्वितीय : दृष्टी (झिरो बजेट प्रॉडक्शन, मुंबई), सवरेत्कृष्ट लेखक : राकेश जाधव (जून-जुलै, जिराफ थिएटर नाटय़संस्था, मुंबई), सवरेत्कृष्ट दिग्दर्शक : स्वप्निल हिंगडे आणि ओंकार राऊत (बत्ताशी), सवरेत्कृष्ट अभिनेता : निलेश सूर्यवंशी (कस्टमर केअर, निर्मिती-दि जिनियस, नाशिक), सवरेत्कृष्ट अभिनेत्री : अश्विनी जोशी (दृष्टी), सवरेत्कृष्ट नेपथ्य : समीर तोंडवळकर (बत्ताशी), सवरेत्कृष्ट प्रकाश योजनाकार : राजेश शिंदे (दृष्टी), सवरेत्कृष्ट ध्वनी संयोजक : अभिजीत पेंढारकर (बत्ताशी).