दप्तराचे ओझे पाठीला लावून शाळेत जाण्याच्या त्रासातून राज्यातील विद्यार्थ्यांची लवकरच सुटका होणार आहे. ई-लर्निग आणि तळहाताएवढय़ा टॅब्लेटच्या माध्यमातून सर्व क्रमिक पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांना सहज सोप्या भाषेत सर्व प्रकारचे अद्ययावत ज्ञान मिळावे यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर देण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. शालेय विद्यार्थ्यांना सहजसोप्या पद्धतीने शिक्षण देणारी प्रणाली राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने तयार केली आहे. सुरुवातीस या तंत्रज्ञानाचा अवलंब करून पंढरपूरजवळील पाच शाळांमध्ये नियमित अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू आदी भाषांमधील विविध स्तरांवरील अभ्यासक्रमात समाविष्ट असलेली सर्व पुस्तके ई- लर्निगच्या रूपात उपलब्ध करून दिली जाणार असून, ‘आकाश’ व अन्य कंपन्यांच्या टॅब्लेटमध्ये हा अभ्यासक्रम अपलोड केला जाणार आहे. त्यामुळे एका टॅब्लेटच्या माध्यमातून शिक्षण घेता येईल. या उपक्रमासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, सी डॅक, आयआयटी आदी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे.