खासगी वाहतूकदारांच्या संपात स्कूल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनही सहभागी होणार असून त्यामुळे राज्यासह मुंबई आणि परिसरातील विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने शुक्रवारी बंद राहणार आहेत. या पाश्र्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलांना शाळेत सोडावे अशा सूचना शाळा आणि बस चालकांकडून पालकांना देण्यात आल्या आहेत.

प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहन चालकांनी सेवा न देण्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनात शालेय वाहतूकदारांची संघटनाही सहभागी होणार आहे. परिणामी शाळेच्या बस, व्हॅन बंद राहतील. त्यामुळे शुक्रवारी आपापल्या मुलांना शाळेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पालकांना उचलावी लागणार आहे. याबाबत गुरुवारी दुपारनंतर संघटनेने आपली भूमिका जाहीर केली. त्यानंतर शाळांनीही स्कूल बस बंद असल्यामुळे मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि नेण्यासाठी स्वत: यावे असे संदेश पालकांना पाठवले आहेत. कॅब, कंपन्यांची वाहनेही बंद राहणार असून त्याबरोबर स्कूल बसही बंद राहणार असल्यामुळे पालकांसाठी शुक्रवार तारेवरच्या कसरतीचा ठरण्याची शक्यता आहे.

पेट्रोल, डिझेल वस्तू व सेवा कराच्या कक्षेत आणावे. इंधनाचे दर सहा महिन्यांतून एकदा निश्चित करण्यात यावेत. राज्यातील सर्व टोल नाक्यांवर शाळेच्या वाहनांना टोलमाफी देण्यात यावी. विम्याच्या हप्त्यात कपात करावी.  प्रादेशिक परिवहन विभागाकडून होणारी वार्षिक वाहन तपासणी बंद करण्यात यावी. त्याऐवजी शालेय वाहतूक सुरक्षा समितीकडून वाहनांची तपासणी करण्यात यावी. शाळेभोवती वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा मिळावी. रस्ते खड्डेमुक्त करण्यात यावेत, अशा मागण्या शालेय वाहतूकदारांच्या संघटनेने केल्या आहेत.