राज्यातील बहुतेक जिल्ह्य़ांतील शाळांमध्ये बुधवारपासून पाचवीपासूनचे वर्ग भरणार असताना, मुंबईतील शाळा मात्र बंदच राहणार आहेत. मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत पालिकेने अद्यापही निर्णय घेतलेला नाही. दहावीच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असतानाही शाळा सुरू न झाल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक हवालदिल झाले आहेत.

राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास २३ नोव्हेंबरपासून परवानगी देण्यात आली. विविध जिल्हा प्रशासनांनी शाळा सुरू करण्यास टप्प्याटप्प्याने परवानगी दिली. मात्र, मुंबई पालिका क्षेत्रातील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. त्यानंतर आता बुधवारपासून (२७ जानेवारी) राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार बहुतेक जिल्हा परिषदांनी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, तर काही स्थानिक प्रशासनांनी १ फेब्रुवारीपासून वर्ग सुरू करण्याचे निश्चित केले आहे.

मुंबईतील शाळा मात्र २७ जानेवारीपासूनही सुरू होणार नसल्याचे दिसत आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाने सोमवारीही

शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे राज्यातील बहुतेक सर्व भागांतील शाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरीही मुंबईतील नववी ते बारावीचे वर्गही सुरू करण्यासाठी पालिकेने संमती दिलेली नाही.

मागणी काय?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ापासून परीक्षा सुरू होणार आहेत. मात्र, शाळाच सुरू न झाल्यामुळे विद्यार्थी अस्वस्थ आहेत. शाळांबरोबरच मुंबईतील खासगी शिकवण्या सुरू करण्यासही परवानगी देण्यात आलेली नाही. वर्षभर विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा आहेत. वर्षभरात प्रात्यक्षिके झालेली नाहीत. विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला आहे. सराव परीक्षेचेही नियोजन करायचे आहे. त्यामुळे शाळा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.