News Flash

करोनामुळे पालक गमावलेल्या ५७८ बालकांचा आतापर्यंत शोध

मुंबईत करोनाने ५७८ बालकांच्या एक किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्याची बाब महिला आणि बाल विकास विभागाच्या पाहणीतून आतापर्यंत समोर आली आहे.

कृती दलाकडून माहिती संकलनाचे काम सुरू

मुंबई : मुंबईत करोनाने ५७८ बालकांच्या एक किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्याची बाब महिला आणि बाल विकास विभागाच्या पाहणीतून आतापर्यंत समोर आली आहे. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागाने या बालकांच्या मदतीसाठी कृती दल स्थापन केला असून या कृती दलाकडून बालकांची माहिती गोळा करण्यात येत आहे.

करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांना मृत्यू ओढावला. कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्याने अनेकांच्या घराचा आधार हिरावला गेला. काही ठिकाणी संपूर्ण कुटुंब करोनाबाधित झाले. त्यातील काही कुटुंबांत घरातील कर्त्यां व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांवर संकट कोसळले. यामध्ये अनेक अल्पवयीन मुले माता-पित्याच्या मायेला पोरकी झाली. त्यांचा जगण्याचा आधार हिरावला गेल्याने या मुलांचा प्रश्न गंभीर झाला. मुंबई उपनगरात करोनाने मृत्यू झालेल्या ३,११८ कुटुंबीयांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत मुंबई उपनगरात करोनामुळे एक पालक गमाविलेली ४४४ बालके आढळून आली आहेत. यातील सात बालकांच्या दोन्ही पालकांचा मृत्यू झाला आहे. मुंबई शहर जिल्हा महिला व बालविकास विभागाला करोनाने मृत्यू झालेल्या १७८३ जणांची यादी मिळाली आहे. त्यातील ९८५ कुटुंबीयांशी विभागाने संपर्क साधला आहे. त्यामध्ये एक पालक गमाविलेल्या मुलांची संख्या १२४ आहे, तर तीन मुलांनी दोन्ही पालक गमाविल्याचे समोर आले आहे.

करोनाने अनाथ झालेल्या मुलांचा संभाळ त्यांचे नातेवाईक करणार असतील तरी या प्रत्येक मुलांची माहिती संकलित केली जाणार आहे. तसेच सरकारने निर्णय घेतलेली सर्वतोपरी मदत या मुलांना दिली जाणार आहे. तसेच भविष्यातही या मुलांना सर्व सुविधा मिळत असल्याची खातरजमा करण्यासाठी विभागाकडून सतत पाहणी केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

विविध यंत्रणांची मदत

करोनाने अनाथ झालेल्या मुलांना मदतीचा हात देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार स्थानिक पातळीवर यंत्रणांनीही अशा मुलांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा कृतीदलाची १ जूनला बैठक पार पडली आहे. करोनाने अनाथ झालेल्या मुलांची माहिती गोळा करण्यासाठी महिला व बालविकास विभागाला विविध यंत्रणांची मदत घेतली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रतिनिधी, पोलीस विभाग आणि सामाजिक संस्थांची मदतही मिळत आहे, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्य्याच्या महिला व बालविकास विभाग अधिकारी शोभा शेलार यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 1:35 am

Web Title: search for 578 missing children so far ssh 93
Next Stories
1 सेना-काँग्रेसची प्रभाग फेररचनेची मागणी
2 ..तर मुंबई महानगर प्रदेशातील चित्र वेगळे असते
3 आर्थिक निकषावरील आरक्षण न्यायालयात टिकणे अशक्य!
Just Now!
X