गरजेच्या वस्तू मिळण्यात अडचणी; घराबाहेर पडणेही दुरापास्त

मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या संचारबंदीचा मोठा फटका एकटय़ा राहणाऱ्या ज्येष्ठांना व अपंग नागरिकांना सहन करावा लागत आहे. घराबाहेर पडणे दुरापास्त झाल्याने या ज्येष्ठांच्या एकटेपणात अधिकच वाढ झाली आहे. आरोग्याच्या अनेक समस्यांशी झुंजणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना इतरांच्या मदतीशिवाय बाहेर काय तर घरातही वावरता येत नाही. त्यात करोनाची लागण होण्याची भीती आणि वाहुतकीच्या साधनांवरील निर्बंधयामुळे घरकाम करणारे, मदतनीस येणे बंद झाल्याने छोटय़ा-छोटय़ा गोष्टींसाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढील २१ दिवसांसाठी केंद्र सरकारने देशभरात संचारबंदी जाहीर केली आहे. याचा सर्वात मोठा परिणाम ज्येष्ठांना सहन करावा लागत आहे. मुले कामानिमित्त परदेशात स्थायिक झाल्याने त्यांना एकटेच राहावे लागते. ही मंडळी घरकामाबरोबरच दैनंदिन गरजांकरिता मदतनीसांवर अवलंबून असतात. स्वयंपाक, देखभाल, औषध-जीवनावश्यक वस्तूंची खरेदी यासाठी मदतनीसांवर अवलंबून असलेल्या एकाकी ज्येष्ठ नागरिकांचे त्यामुळे प्रचंड हाल होत आहेत.

दक्षिण मुंबई, दादर, पार्ले येथे मोठय़ा संख्येने एकाकी ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यांच्याकडे काम करणारे मदतनीस बऱ्याचदा विरार, नालासोपारा अशा उपनगरातून रेल्वेचा प्रवास करून येत असतात. मात्र आता वाहतुकीची साधने बंद झाल्याने या कामगारांना कामावर जाणे दुरापास्त झाले आहे. परिणामी ज्येष्ठांच्या मदतीसाठी कोणीच नाही. त्यातही वृद्धापकाळामुळे हालचालींवर मर्यादा आल्याने त्यांचे मदतनीसांशिवाय पानही हलत नाही. बऱ्याच जणांना उपचारांसाठी वरचेवर दवाखान्यात जावे लागते. अशा ज्येष्ठांना दळणवळणासाठी कोणतीच साधने उपलब्ध नाहीत. परिणामी त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

मालाड येथील ज्येष्ठ नागरिक विराली मोदी यांनी त्यांच्या अडचणींना ट्वीटरच्या माध्यमातून वाचा फोडली. मोदी यांना आठवडय़ातून तीन वेळा डायलिसीस करण्यासाठी जावे लागते. मात्र सध्या वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मोदी यांच्या ट्वीटनंतर पोलिसांनी त्यांना संपर्क साधून मदत देऊ केली. हीच परिस्थिती अनेकांची असून काहींनी त्यांच्या अडचणींना समाजमाध्यमांवरून वाचा फोडली आहे.  ज्येष्ठ नागरिक असलेले विकास (नाव बदलून) हे एकटेच राहतात.

घरकाम करणारी महिला येत नसल्याने त्यांना स्वत:च सर्व कामे करावी लागतात. एकटेपणामुळे दिवस घालविणे शक्य नसल्याचे ते सांगतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री घोषणा केल्यानंतर २१ दिवस घराबाहेर पडता येणार नाही या भीतीने त्यांची गाळण उडाली. त्यांना आरोग्याची समस्या असल्याने औषधे मिळतील की नाही या भीतीने त्यांचा थरकाप उडाला होता. गर्दीमुळे करोनाच्या प्रादुर्भाव होण्याची भीती असतानाही त्यांनी गर्दीतून वाट काढत २१ दिवसांच्या औषधांची तजवीज केली. सध्या प्रचंड मानसिक ताण असून तो व्यक्त करण्यासाठी कोणालाही भेटण्याची सोय नसल्याची व्यथा ते व्यक्त करतात. तर विजय यांनी करोनाच्या धास्तीमुळे घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे. एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी स्वतची कामे करणे, वाचन, व्यायाम, टीव्ही पाहणे आदींमध्ये वेळ घालवत असल्याचे ते सांगतात.

‘सरकारने यंत्रणा निर्माण करावी’

मुंबईत सुमारे १२ लाख ज्येष्ठ नागरिक असून त्यातील अंदाजे ४ लाख ज्येष्ठ एकटेच राहतात. संचारबंदी जाहीर झाल्याने हे ज्येष्ठ घरात अडकून पडले आहेत. हेल्पेज संस्थेचे स्वयंसेवक ज्येष्ठांना फोन करून विचारपूस करत आहोत. त्यांच्या अडचणी जाणून घेत आहोत. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत सूचना देत आहोत. तसेच संस्थेच्या पातळीवर त्यांना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर सरकारनेही ज्येष्ठांना मदत देणारी यंत्रणा निर्माण करावी, अशी मागणी हेल्पेज इंडियाचे प्रकाश बोरगावकर यांनी केली आहे.