30 May 2020

News Flash

उपनगरांतही सुका कचरा विलगीकरण

कुलाब्यातील केंद्राच्या धर्तीवर पूर्व, पश्चिम उपनगरांत केंद्रे

कुलाब्यातील केंद्राच्या धर्तीवर पूर्व, पश्चिम उपनगरांत केंद्रे

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : गोळा झालेल्या कचऱ्यातून सुका कचरा वेगळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुलाबा येथे सुका कचरा विलगीकरण केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून आता त्याच धर्तीवर पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये सुका कचरा विलगीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

कचराभूमींवरील कचऱ्याचा भार कमी व्हावा यासाठी पालिकेने मोठय़ा सोसायटय़ांना ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणे बंधनकारक केले आहे. मात्र खूपच कमी सोसायटय़ा या नियमाचे पालन करतात. त्यामुळे पालिकेने शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये सुका कचरा विलगीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्वारस्याची अभिव्यक्ती मागविण्यात आली होती. केवळ शहरातील केंद्रासाठी निविदा प्राप्त झाली. त्यानुसार शहरातील सुक्या कचऱ्याचे विलगीकरण केंद्र कुलाबा येथे उभारण्यात येणार असून त्याच्या उभारणीबाबतची आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कुलाब्याच्या धर्तीवर आता पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये सुका कचरा विलगीकरण केंद्र उभारण्यासाठी पुढील आठवडय़ात पुन्हा निविदा मागविण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. हे केंद्र उभारण्यास इच्छुक असलेल्या संस्थेला प्रतिदिन किमान ५० मेट्रीक टन क्षमतेचा सुका कचरा प्रक्रिया यंत्रसंच स्थापित करावे लागणार आहे. तसेच भविष्यात त्याची क्षमता प्रतिदिन २५० मेट्रीक टनापर्यंत वाढवता येऊ शकेल, अशी अट घालण्यात आली आहे. घरोघरी जाऊन कचऱ्याचे संकलन करणे, त्याची वाहतूक करण्याची जबाबदारीही संस्थेवरच सोपविण्यात येणार आहे. पूर्व उपनगरांमधील देवनार, घाटकोपर, तसेच पश्चिम उपनगरातील वांद्रे, मालाड येथील भूखंडाची सुका कचरा विलगीकरण केंद्रासाठी निवड करण्यात येणार आहे. पालिकेकडून संस्थेला एक रुपया प्रति चौरसमीटर प्रति वर्ष भाडय़ाने जागा उपलब्ध करण्यात येणार असून तेथे ‘बांधा, स्वामित्व, प्रचालन व हस्तांतरण’ या तत्त्वावरील केंद्रासाठी १५ वर्षांचा करार करण्यात येणार आहे.

शहराप्रमाणेत पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये सुका कचरा गोळा करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सुका कचरा गोळा करण्यास चालना मिळेल. त्याचबरोबर कचराभूमीत जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी होईल.

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ‘जी-उत्तर’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2020 3:45 am

Web Title: segregation of dry waste and wet waste now in mumbai suburbs zws 70
Next Stories
1 रुग्णांच्या पत्नींकडून एकमेकींच्या पतीला मूत्रपिंडदान
2 गुंतवणूक कशी व कुठे करावी?
3 सागरी सेतूवर ‘फास्टॅग’ सुसाट
Just Now!
X