News Flash

ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक आजारांकडे दुर्लक्ष!

वृद्धांचे मानसिक, शारीरिक, आर्थिक इत्यादी दृष्टिकोनातून होणाऱ्या शोषणाविषयी या अभ्यासात मांडले आहे.

|| शैलजा तिवले

 

स्मृतीशी निगडित मानसिक आजारांचे प्रमाण ७१ टक्के; आर्थिक, मानसिक शोषणाबाबत अनभिज्ञ :- वृद्धांमधील मानसिक आजारांकडे दुर्लक्ष केले जात असून जवळपास ७१ टक्के ज्येष्ठ नागरिकांना स्मृतीशी निगडित मानसिक आजार असल्याचे माहीतच नाही, असे धक्कादायक वास्तव शीव रुग्णालयातील मानसोपचार विभागाने संशोधनात्मक अभ्यासातून अधोरेखित केले आहे. आर्थिक, मानसिक इत्यादी प्रकारे होणाऱ्या शोषणाबाबत ज्येष्ठ नागरिक अनभिज्ञ असल्याचे या अभ्यासात मांडले आहे.

शीव येथे खासगी संस्थेने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या शिबिरात मुंबईतील विविध भागांमधून आलेल्या ९४ जणांचा अभ्यास या विभागाने केला होता. हे संशोधन नुकतेच ‘इंडियन जर्नल ऑफ मेंटल हेल्थ’या संशोधनपत्रिकेमध्ये प्रसिद्ध झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांमधील स्मृतीविषयी निगडित आजार, दैनंदिन कामांवर होणारा परिणाम आणि विविध मार्गानी होणारे शोषण याचा अभ्यास यामध्ये केला आहे.

या अभ्यासानुसार, ज्येष्ठ नागरिकांमधील जवळपास ७१ टक्के रुग्णांमध्ये स्मृतीशी निगडित मानसिक आजार असल्याचे निदर्शनास आले आहे, तर ३३ रुग्णांमध्ये नैराश्य, स्मृतिभ्रंश, स्क्रिझोफ्रेनिया, आयसोमेनिया, दारूशी संबंधित मानसिक आजार आढळले आहेत. मात्र याचा त्यांच्या दैनंदिन कामावर कोणताही परिणाम होत नाही, म्हणून त्यांनी कोणतेही उपचार किंवा तपासण्या केलेल्या नाहीत.

वृद्धांचे मानसिक, शारीरिक, आर्थिक इत्यादी दृष्टिकोनातून होणाऱ्या शोषणाविषयी या अभ्यासात मांडले आहे. यातील ५२.४ टक्के ज्येष्ठ नागरिकांचे शोषण होत असूनही त्यांनी यासंबंधी कोणत्याही ठिकाणी तक्रार केलेली नाही, असेही यात नमूद केले आहे. लोकमान्य टिळक महाविद्यालयातील मानसोपचार विभागातील निवासी डॉक्टर अक्षय चोरडिया, साहाय्यक प्राध्यापक डॉ. सागर कारिया, डॉ. रितिका दीक्षित, विभागप्रमुख डॉ. निलेश शाह, सहप्राध्यापक डॉ. हिना र्मचट आणि संशोधन साहाय्य डॉ. अविनाश डिसूझा यांनी याबाबत संशोधन व अभ्यास केला आहे.

ज्येष्ठांच्या सर्वेक्षणाची गरज

ज्येष्ठांमधील मानसिक आजारांकडे सुरुवातीच्या टप्प्यातच गांभीर्याने लक्ष न दिल्याने पुढच्या टप्प्यांमध्ये यातील गुंतागुत वाढते. तेव्हा ६० वर्षांनंतर शारीरिक तपासण्यांसह मानसिक चाचण्याही करणे आवश्यक आहे. तसेच वृद्धांचे होणारे शोषण या विषयीही जनजागृती होणे गरजेचे आहे. शोषणाची व्याख्या अधिक स्पष्ट करून त्याविषयी दाद मागण्यासाठीच्या पर्यायांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. ज्येष्ठांमधील मानसिक आजारांचे सर्वेक्षण होऊन दुर्लक्षित आजार आणि रुग्णांचा शोध घेणे सध्याच्या घडीला महत्त्वाचे आहे, असे मत या अभ्यासाचे सहलेखक डॉ. सागर कारिया यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 12:12 am

Web Title: senior citizen mental health disease akp 94
Next Stories
1 ‘एमफिल’, ‘पीएचडी’च्या विद्यार्थ्यांना संशोधनशुचितेचा अभ्यासक्रम बंधनकारक
2 एसी लोकल, सिग्नलला बळ!
3 अमन लॉज-माथेरान मिनी ट्रेन आजपासून सुरू
Just Now!
X