16 February 2019

News Flash

तळवलकरांच्या निधनाने ‘वैचारिक व्यासपीठ’ हरपले- शरद पवार

मराठी पत्रकारितेतील एका पर्वाचा अंत झाल्याची भावना

Govind Talwalkar : गोविंद तळवलकरांच्या आठवणींना उजाळा देताना पवार यांनी म्हटले की, महाराष्ट्रातल्या वृत्तपत्रांमध्ये ज्यांच्या लिखाणाची चर्चा घरोघरी होत असे अशा संपादकांमध्ये गोविंदराव तळवलकर यांचा उल्लेख अवश्य करावा लागेल.

गोविंद तळवलकर यांच्या निधनाने आपण एका प्रगल्भ संपादकाला मुकलो आहोत. त्यांच्या निधनाने एक वैचारिक व्यासपीठ हरपले आहे, अशी भावना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार, राजकीय घडामोडींचे साक्षेपी विश्लेषक आणि लेखक गोविंद तळवलकर यांचे बुधवारी अमेरिकेतील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेतील एका पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होताना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे तळवलकर यांना श्रद्धांजली वाहिली. गोविंद तळवलकरांच्या आठवणींना उजाळा देताना पवार यांनी म्हटले की, महाराष्ट्रातल्या वृत्तपत्रांमध्ये ज्यांच्या लिखाणाची चर्चा घरोघरी होत असे अशा संपादकांमध्ये गोविंदराव तळवलकर यांचा उल्लेख अवश्य करावा लागेल. एम. एन. रॉय यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या विचारवंतांचे ते प्रतिनिधी होते. गोविंदरावांचे वैशिष्ट्य म्हणजे विविध प्रश्नांवरचे लिखाण व साहित्याचे प्रगाढ वाचन. मग ते साहित्य महाराष्ट्राचे असो वा इतर देशांतील लेखकांचे. पाश्चिमात्य विचारवंतांच्या विचारांशी गोविंदरावांचा विशेष  घरोबा होता. भारतातल्या विद्वद्जनांशीही त्यांचा अखंड सुसंवाद असे. यशवंतराव चव्हाण, लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. गोवर्धनदास पारेख, अ. भि. शाह यांच्यापासून पु. ल. देशपांडेंपर्यंत त्यांचा गोतावळा मोठा होता, असे पवार यांनी म्हटले. तसेच त्यांनी लिहिलेले अग्रलेख एकेकाळी चर्चेचा विषय असत. १९७८ ला त्यांनी लिहिलेला अग्रलेख ‘हे राज्य जावे ही श्रींची इच्छा’ किंवा ‘संन्याशाचा सदरा’ अशा अनेक अग्रलेखांची सर्वसामान्यांमध्ये चर्चा होत असे. देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास असो किंवा न्या. रानडेंचे विचारदर्शन या संदर्भातले त्यांचे लिखाण हे सखोल आणि अभ्यासपूर्ण असल्याचे पवार यांनी सांगितले.

तर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीदेखील तळवलकरांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. तळवलकरांच्या निधनामुळे पत्रकारिता व साहित्यातील मार्गदर्शक हरपला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

cm_devendra

First Published on March 22, 2017 12:10 pm

Web Title: senior journalist and eminent writer govind talwalkar passed away sharad pawar