मुंबईमधील कोळीवाडे आणि गावठाणांमधील रहिवासांना स्वतंत्र जलजोडणी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यामुळे तेथील रहिवाशांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघणार आहे. त्यामुळे आता कोळीवाडे आणि गावठाणांमधील रहिवाशांना लवकरच प्रतिदिन ९० लिटर पाणी मिळणार आहे.
मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाणांमध्ये पाण्याची प्रचंड वानवा होती. स्वतंत्र जलजोडणी मिळत नसल्यामुळे तेथील रहिवासी हतबल झाले होते. त्यामुळे अनधिकृतपणे जलवाहिन्यांमधून पाणी घेण्याचे प्रकार वाढले होते.
मुंबईमधील १९६४ पूर्वीचे कोळीवाडे आणि गावठाणांना पालिकेकडून नळजोडण्यात देण्यात येत होत्या. राज्य सरकारने १९९५ पर्यंतच्या झोपडय़ा अधिकृत केल्यामुळे त्यांनाही पालिकेकडून पाणीपुरवठा केला जात होता. याच धर्तीवर आपल्यालाही स्वतंत्र जलजोडणी द्यावी, अशी मागणी कोळीवाडे आणि गावठाणांमधील रहिवासांकडून वारंवार करण्यात येत होती. अखेर पालिका प्रशासनाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन कोळीवाडे आणि गावठाणांमधील रहिवाशांना स्वतंत्र नळजोडणी देण्याचा निर्णय घेतला.