जगातील सर्वात उंचावरील भूप्रदेश म्हणून तिबेटची ओळख आहे. डोंगररांगांच्या कुशीत वसलेला हा भूप्रदेश राजकीयदृष्टय़ा अशांत असला तरी निसर्गसौंदर्य, लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती आणि बौद्ध धर्मगुरू दलाई लामांमुळे नेहमीच चर्चेत असतो. जागतिक कीर्तीचं उंच शिखर एव्हरेस्टही याच भूमीत आहे. त्यामुळे भटक्यांसाठी तर हा भूप्रदेश म्हणजे नंदनवनच. भारताच्या ईशान्य आणि पूर्वेकडील सर्व देशांमधील पदार्थ हे चायनीज या पंक्तीतच मोडतात, असा अनेकांचा समज. पण येथील प्रत्येक देशाची एक वेगळी खाद्यसंस्कृती आहे. तिबेटही त्याला अपवाद नाही. त्यामुळे तिबेटचा विषय निघाला की सर्वप्रथम ‘मोमोज’ हा पदार्थ डोळ्यांसमोर येतो. म्हणूनच मोमोज आणि इतर तिबेटियन पदार्थाची खरी लज्जत तुम्हाला चाखायची असेल तर गेली तब्बल सोळा वर्षे मुंबईत तिबेटियन पदार्थाची ट्रीट देणाऱ्या ‘सरण्या – तिबेटियन किचन’ या छोटेखानी रेस्टॉरंटला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

तिबेटियन भाषेत ‘सरण्या’ म्हणजे ‘गोल्ड फिश’. कमल पाशा यांनी सुरू केलेल्या या रेस्टॉरंटची मुख्य धुरा सिल्व्हेस्टर सांभाळतात. ते मूळचे सिक्किमचे. ‘सरण्या’मधील सर्व पाककृती त्यांची आई आणि काकूंच्या आहेत. सिल्व्हेस्टर यांचे वडील तिबेटियन आणि आई भूतानची. त्यामुळे येथे मिळणाऱ्या सर्व पदार्थाचा पारंपरिक बाज कायम आहे. मुंबईत अनेक रेस्टॉरंटमध्ये चायनीज आणि थाई फूड मिळतं पण तिबेटियन फूड असं कधीच वाचनात किंवा ऐकिवात येत नाही. ‘सरण्या’च्या मेन्यूची सुरुवातच ‘मोमोज’ने होते. चिकन, पोर्क आणि प्रॉन्झ असे तीन प्रकार वाफवलेले, पॅन फ्राय आणि डीप फ्राय या तीन पद्धतींमध्ये मिळतात. कलात्मक अशा बांबूच्या डब्यात केळीच्या पानावर ठेवलेले वाफवलेले मोमोज आजवर मी खाल्लेले सर्वात ज्युसी आणि चविष्ट मोमोज आहेत. कारण इतर ठिकाणी डीप फ्रीज केलेले तयार मोमोजच पुन्हा वाफवून विकले जातात. मोमोजच्या आतला मसाला येथेच तयार केला जातो. एवढंच नव्हे तर त्याचं आवरणही पापुद्रय़ासारखं पातळ असतं त्यामुळे इथले मोमोज नक्कीच वेगळे आहेत.

नेहमीच्या मोमोजपेक्षा दोन अतिशय वेगळ्या प्रकारचे खास तिबेटियन स्टाइलचे मोमोज येथे मिळतात. टी आणि लोलो मोमो. टी मोमोमध्ये मोमो ब्रेड हा चिकनच्या ग्रेव्हीसोबत सव्‍‌र्ह केला जातो. सोबतीला करंज्याही असतात, ज्याच्या आतमध्ये हिरव्या पातीच्या कांद्याचं सारण असतं. हा संपूर्ण प्रकारच भन्नाट आहे. तर लोलो मोमो बन हा चिकन, अंड, भाज्या यांनी स्टफ केलेला असतो.

तिबेटियन खाद्यसंस्कृतीमधील आणखी एक नावाजलेला पदार्थ म्हणजे तिबेटियन नुडल्स सूप ज्याला थुक्पा असं म्हणतात. तिबेटच्या पूर्वेकडील भागातील हा प्रकार डोंगराळ प्रदेशातील लोकांच्या आहारातील परंपरागत आणि महत्त्वाचा पदार्थ आहे. मुंबईत तुम्हाला थुक्पाची लज्जत चाखायची असेल तर ‘सरण्या’ला पर्याय नाही. एका मोठय़ा बाऊलमध्ये नूडल्स, भाज्या आणि चिकन किंवा पोर्क यांची सरमिसळ असलेला हा पदार्थ म्हणजे खरं तर एक संपूर्ण जेवणच म्हणावं लागेल.

इथला मेन्यू तुम्हाला नीट वाचायचा असेल आणि पदार्थ ओळखायचे तर काही शब्द तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. झासा म्हणजे चिकन, खाकसा म्हणजे पोर्क, न्यासा म्हणजे मासे किंवा सीफूड. स्टार्टर, राईस आणि नूडल्स या तीन प्रकारांत नानाविध प्रकार येथे मिळतात. जितकं वेगळेपण त्यांच्या नावात आहे तितकंच प्रत्येकाच्या चवीत आणि मांडणीत.

पांढरा, चॉकलेटी आणि लाल (रंग लावलेला नाही तर खराखुरा लाल) अशा तीन वेगळ्या प्रकारच्या तांदळाचे पदार्थ येथे मिळतात. लाल तांदूळ हा थेट सिक्किमवरून येतो. भूतानी लोकांच्या आहारामधील हा मुख्य पदार्थ आहे. तयार नूडल्समध्ये खूप अंड असतं त्यामुळे अंडय़ाचं कमी प्रमाण असलेले नूडल्सही इनहाऊसच तयार केले जातात. त्याचप्रमाणे आधी ते वाफवून नंतर उकळवून घेतल्याने त्याचा फ्लेवर कायम राहतो. छांग म्हणजेच राइस वाइनचा वापरही इथल्या पदार्थामध्ये केला जात असल्याने पदार्थाना एक वेगळी चव प्राप्त होते. अजिनोमोटोचा वापर नसल्यासारखाच. सर्व सॉसही येथेच तयार केले जातात. ‘सरण्या’च्या सॉसमध्ये पाच वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पालक पालेभाजीचा रस, लसूण यांचा सॉसमध्ये वापर केला जातो. तिखट आणि गोड सॉसच्या जोडीने केवळ ‘सरण्या’मध्येच मिळणारी एक काळपट रंगाची सुकी चटणी चवीला एकदम भारी आहे. ही चटणी तुम्ही कुठल्याही पदार्थासोबत खाऊ  शकता. नऊ  वर्षांपूर्वी ‘सरण्या’ची एक शाखा मालाड येथेही उघडण्यात आली. दोन्ही ब्रँचमधील पदार्थाची चव सारखी ठेवण्यामागेही इनहाऊस सॉस, नूडल्स आणि पदार्थ बनवण्याच्या समान पद्धतीचा मोठा वाटा आहे.

तिबेटियन लोकांच्या नेहमीच्या आहारात समाविष्ट असणारे सर्व महत्त्वाचे पदार्थ तुम्हाला येथे खायला मिळतील. रेड मीट हा तिबेटियन लोकांच्या आहारातला मुख्य भाग असला तरी भारतीयांच्या आवडीनुसार चिकन आणि माशांना येथे प्राधान्य देण्यात आलंय. म्हणूनच कोलंबी, पापलेट हे मासे आणि मागणीनुसार खेकडय़ाचाही पदार्थामध्ये समावेश केला जातो. फक्त नॉन-व्हेज लोकांचीच चंगळ आहे असं नाही तर प्रत्येक पदार्थासाठी येथे व्हेजचाही पर्याय आहे. त्याशिवाय तिबेटियन पदार्थासोबतच चायनीज पदार्थाचाही मेन्यूमध्ये समावेश आहे. ‘सरण्या’तील पदार्थ चांगल्या प्रतीचे तर आहेतच पण किमतीच्या मानाने प्रमाणातही कुठेच तडजोड केलेली दिसत नाही. नेहमीच्याच मसालेदार आणि चटपटीत पदार्थापेक्षा वेगळ्या लोकसंस्कृतीचे आणि क्वचितच कुठे मिळणारे नवीन पदार्थ खायचे असतील तर ‘सरण्या’ला आवर्जून भेट द्यायला हवी.

सरण्या – तिबेटियन किचन

  • कुठे – १८५, ओशिवरा लिंक रोड, के. ए. वालावलकर मार्ग, आदर्शनगर, तारापूर चौक, हायलॅण्ड पार्क, अंधेरी (पश्चिम), मुंबई – ४०००५३
  • कधी – सोमवार ते रविवार सकाळी ११.३० ते रात्री १२ वाजेपर्यंत.

nanawareprashant@gmail.com

@nprashant