मातृसंस्था संघाने तोगडियांचे पंख कापले; अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समर्थक पराभूत

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपायी संघटनेच्या इतिहासात प्रथमच घ्याव्या लागलेल्या निवडणुकीत तोगडिया यांच्या उमेदवारास दारुण पराभवाची धूळ चारून मातृसंस्था रा. स्व. संघाने विहिंपमधील तोगडिया यांचे वादळी पर्व संपुष्टात आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र या निवडणुकीनंतर  विहिंपबाहेर फेकल्या गेलेल्या डॉ. तोगडिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून  त्यांनी संघपरिवारासमोर दंड थोपटून आहेत.

गेल्या वर्षी २७ ते २९ डिसेंबर दरम्यान भुवनेश्वर येथे झालेल्या विहिंपच्या बठकीतच डॉ. तोगडिया यांच्या भावनांचा उद्रेक झाला होता. विहिंपवर आपले वर्चस्व भक्कम करण्याचे त्यांचे मनसुबेही तेव्हाच उघड झाले होते व त्यामुळेच निवडणूक घेणे भाग पडले असे रा. स्व. संघातील वरिष्ठ सूत्रांचे मत आहे. आपण विहिंपच्या आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्षपदी कायम राहणार असा आग्रह त्या बठकीत त्यांनी धरल्याने संघटनेत नाराजीचा सूर उमटला होता. विहिंपचे नेते अशोक सिंघल हे हयात असताना, संघटनेतील या पदावरील नियुक्तीचे सर्वाधिकार त्यांच्याकडे होते. सिंघल यांच्या पश्चात डॉ. तोगडिया यांनी संघटनेच्या शिस्तीचा शिरस्ता मोडून संघ-भाजपमधील नेत्यांच्या विरोधात जाहीर पवित्रा घेण्यास सुरुवात केल्याने, विहिंप आणि सत्ताधारी भाजप यांच्यातील दरी अधिकच रुंदावली होती. पंतप्रधान मोदी हे परिवारातील संघटनात्मक रचनेनुसार कितीतरी कनिष्ठ असल्याची भावना तोगडिया यांच्या कृती-उक्तीमधून लपून राहात नसल्याने, कधीतरी हा संघर्ष तीव्र होणार याची जाणीव संघ नेतृत्वास झाली होती. त्यामुळेच, उभय संघटनांमध्ये समन्वय घडवून आणण्याचे प्रयत्नही संघाने सुरू केले होते. भुवनेश्वर बठकीत त्यासाठीच संघाचे सरकार्यवाह भयाजी जोशी यांना पाचारण करण्यात आले होते. मात्र तेथे तोगडियांनी घेतलेल्या हट्टी भूमिकेमुळे, हा विहिंपमधील अंतर्गत मामला असल्याने सामंजस्याने तो सोडवावा असा सल्ला देऊन भयाजी जोशी यांनीही तेव्हा काहीशी त्रयस्थ भूमिका घेणेच पसंत केले होते.

तोगडिया यांना आवर घालण्याच्या निर्णयावर त्याच वेळी संघाने शिक्कामोर्तब केले असे समजते. त्यानंतर तोगडिया अधिकच आक्रमकपणे सत्ताधारी भाजपच्या विरोधात उतरले. त्यातच त्यांनी अलीकडेच घडवून आणलेल्या अपहरण नाटय़ामुळे तर संघपरिवारात तोगडिया यांच्याविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली व तोगडिया यांचे पंख कापण्याचे संघाने ठरविले. शनिवारी हरियाणातील गुरुग्राम येथे झालेल्या निवडणुकीत हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल न्या. विष्णू सदाशिव कोकजे यांनी राघव रेड्डी या तोगडिया यांचे समर्थन असलेल्या उमेदवाराचा ७१ मतांनी पराभव केला. कोकजे यांची संघटनेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होऊन रेड्डी यांचा दारुण पराभव झाल्यामुळे तोगडिया यांचे विश्व हिंदू परिषदेतील स्थान संपुष्टात आल्याचे मानले जात आहे.

संघपरिवारात जेव्हा जेव्हा व्यक्तिस्तोम संघटनेहून वरचढ होऊ लागते, तेव्हा तेव्हा त्या व्यक्तीस त्याची जागा दाखविण्याकरिता त्याचे पंख कापले जातात. तोगडिया यांनाही संघाच्या याच नीतीचा फटका बसल्याचे आजच्या निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. ज्यांनी ज्यांनी स्वत:ची प्रतिमा संघटनेहून मोठी करण्याचा प्रयत्न केला, त्यांना हेच परिणाम भोगावे लागले, असे संघाच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकसत्ताशी बोलताना सांगितले. व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा उंचावणे हे मानसिक अध:पतनच असल्याने, भविष्यात सत्तासंघर्ष निर्माण होऊ शकतात, हीच भीती संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनादेखील होती. त्यामुळेच, कोणा व्यक्तीला सर्वोच्च पद देण्याऐवजी, भगव्या ध्वजास संघटनेत सर्वोच्च स्थान दिले, असे हा नेता म्हणाला. तोगडिया हे व्यक्तिगत अध:पतनाचे बळी ठरले आहेत, असेही मत त्याने व्यक्त केले.

दरम्यान, आपण लवकरच एक मोठी घोषणा करणार आहोत, तोवर समर्थकांनी संयम पाळावा, असे आवाहन डॉ. तोगडिया यांनी ट्विटरवरून केल्याने, तोगडिया आणि संघपरिवार यांच्यातील संघर्ष चव्हाटय़ावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.